मार्गशीर्ष संपता संपता घराघरांतून तीळ,दाणे भाजल्याचे ,पोळीसाठी केलेल्या गुळाचे वास यायला लागले की पूर्वी संक्रांत जवळ आल्याचे समजायचे.खूप हौशी गृहिणी पांढराशुभ्र काटेरी हलवा घरी करायच्या.मंद निखार्यावर परातीत थोडे थोडे तीळ परतत ,त्यावर चमच्याने साखरेचा पाक टाकत हलवा करणे हे फार कौशल्याचे, वेळखाऊ व चिकाटीने करण्याचे काम करण्यात बायका निपुण होत्या आणि काहीजणी त्यावर थोडेसे अर्थार्जनही करत.बाळाचे,नवविवाहितांचे दागिने घडविण्यासाठी फुटाणे,खसखस,बदाम,
शेंगदाणे असा विविध प्रकारचा हलवा बनवून तर्हेतर्हेचे लहान मोठे दागिने बनविण्यात मुली स्त्रियांचा हातखंडा असायचा.आजही दुकानांमध्ये महिनाभर आधीपासून विक्रीसाठी दागिने ठेवण्यासाठी 3-3 महिने तयारी चाललेली असते कारण पूर्वी जो सण घरातल्यांनी हौसेने साजरा करायची पद्धत होती,त्याला दिखाव्याचे स्वरूप आले आहे आणि उत्तमातले उत्तम हलव्याचे दागिने खरेदी करण्यासाठी लोक पैसे मोजण्यास तयार आहेत.
संक्रांत म्हणजे गुळाची पोळी हवीच आणि ती उत्तम करता येणं,ही पण एक कसोटी आहे.आता गुळाच्या पोळ्या,पोळीचा गूळ आणि तिळगूळ सारंच विकत मिळत असल्याने सणाची अशी काहीच गडबड नसते.
अन्य सणांप्रमाणेच संक्रांतीचेही वैशिष्ठ्य आहे.ह्या ॠतुत एकूणच भाजीपाल्याची रेलचेल असते.त्यामुळे भोगीच्या भाजीतल्या सर्व शेंगा,ओला हरबरा,गाजर,वांगी ,वगैरेची एकत्र भाजी,थंडी असल्यामुळे बाजरीची भाकरी,लोणी मुगाची खिचडी,साजुक तुपासह
गुळाची पोळी, असा आरोग्यदायी आहार म्हणजे पंचपक्वान्नही मागे पडतील.आपल्या प्रत्येक सणाचा आहार हा ॠतुनुसार,हवामानानुसार आणि त्या काळात उपलब्ध असणार्या गोष्टींनुसार ठरतो.संक्रांतही त्याला अपवाद नाही.
रथसप्तमीपर्यंत चालणारे हळदीकुंकु आणि लुटायच्या वस्तू हेही एक संक्रांतीचे आकर्षण असते. लुटण्यासाठी प्लॅस्टीकच्या असंख्य लहान मोठ्या वस्तूंनी बाजारपेठा फुललेल्या दिसतात.
पर्यावरणाचा र्हास करणारी वस्तू हातात आली की वाण म्हणूनही घ्यायला मला तरी नकोसं वाटतं.फार पूर्वी लुटणं,म्हणजे शेतातला भाजीपाला,ऊस,हरबर्यच्या पेंढ्या वगैरे एका कोपर्यात रचून ठेवलं जायचं आणि त्यातून प्रत्येकीने जे हवं ते घ्यायचं,अशी पद्धत असल्याचे माझे वडील सांगायचे.आता ते शक्य नाही,तर मूठभर धान्यचं लुटावं.हे विचारांचं संक्रमण कधी आणि कसे होणार?
घरात,आपापसात संवादच नाही,तर गोड बोलणं दूरच राहिलं.आता उद्या मिनिटामिनिटाला संक्रांतीच्या शुभेच्छांचे मेसेज येतील.म्हणतात ना"बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी"तशी परिस्थिती आहे.
संक्रांत हा एकच सण आहे जो खगोलशास्त्राच्या निकषांवर आपण साजरा करतो.त्यामुळे ती तारीख कधी बदलत नाही,तिथी मात्र दरवर्षी वेगळी येते.
तरीही परंपरेने त्यात ऋतुनुसार खाद्यपदार्थांची,
काळ्या रंगाच्या वस्त्रांची,
हलव्याच्या दागिन्यांनी बाळाचे,नवविवाहितांचे कौतुक करण्याची,अशा सण साजरा करण्याच्या अनेक प्रथा आहेत.पण सध्या वेळेअभावी आणि पैसा जास्त असल्याने अन्य सणांप्रमाणेच त्यातला मूळ गाभा हरवत चालला आहे.हलवा गोड असला तरी त्याला काटे असतात.पूर्वी वडिलधार्या माणसांच्या बोलण्यातले तीव्र शब्द काट्यासारखे टोचणारे असायचे,हे खरं आहे.पण त्यामागे काळजीचा,प्रेमाचा,गोडवाही असायचा,हे विसरता येणार नाही.
नविन वर्षाचे संकल्प करून पंधरवडा उलटेपर्यंतच संक्रांत येते.तेव्हा वरवरचं,औपचारिक नव्हे,तर खरोखरच गोड बोलण्याचा,पर्यावरणाची काळजी घेऊन वस्तू लुटण्याचा संकल्प केला,तर विचारांचं संक्रमण झालं,असं म्हणता येईल.