होता दोन श्वासांचे मिलन
एक नवा श्वास घेई जन्म!
ते दोन श्वास प्रेमाने देती
निज श्वासातला श्वास ,
भरविती घासातला घास,
नवा श्वास वाढे दिन मास!
शेवटच्या श्वासापर्यंत मायबाप ते उभे राहती लेकरापाठी,
श्वास त्यांचा अडे काळजीपोटी!
श्वास मिळाले किती कुणाला,
किती खर्चले,उरले किती,
हिशेब सारा ठेवे तो जगज्जेठी!
प्राप्त श्वास जे आले हाती,
लागावेत सत्कारणी!
घेता यावे काही श्वास देशासाठी,
थोडे देता यावेत समाजासाठी!
जगण्यासाठी श्वास आवश्यक
परी त्या श्वासासाठी झगडणे नको!
स्वतःचे संपता,कृत्रिम श्वासावर जगणे नको!
वेळ न कोणी जाणे अंतिम श्वासाची
नसे स्थानाची निश्चिती!
पण तो श्वास असावा
आनंदाने निरोप घेण्याचा,
कर्तव्यपूर्तीच्या समाधानाचा,
ज्या दोन श्वासांनी दिधले जीवन,
त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा!
No comments:
Post a Comment