स्वर
स्वरांची दैवी देणगी लाभलेल्या अनेक महान व्यक्ती आपल्या सर्वांच्याच आवडीच्या, आदरणीय असतात. मंगेशकर घराणे तर सरस्वतीचा वारसा लाभलेले. लता दीदी असोत, आशाताई असोत, उषा ताई असोत, प्रत्येकीच्या गळ्यातल्या स्वराचे सामर्थ्य वेगळे. रसिकांना मात्र सगळेच स्वर भावणारे, रिझवणारे. एकासारखे दुसरे नाही तरी प्रत्येक स्वर हा भुरळ घालणाराच. कुणाचा स्वर सुगम संगीतासाठी चांगला लागतो, कुणाचा स्वर शास्त्रीय तानांमधे फिरतो, कुणाचा स्वर भूपाळ्या, स्तोत्रांमधे निनादतो, कुणाचा स्वर लावणीवर ठेका धरायला लावतो तर कुणाचा ईश्वर आराधनेत तल्लीन करतो. किती हे स्वरांचे वेगळेपण आणि हे दैवी देणे लाभलेले किती महान कलाकार , जे आपल्या कलेच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात. भीमसेनजींच्या भूपाळ्यांनी अगदी देवालाही जाग येत असेल. सुबलक्ष्मींची स्तोत्रे किती गोड आळवणी करणारी, किशोरकुमार, मोहम्मद रफी यांच्या स्वरांची जादू रसिकमनांवर सतत गारूड तर करतेच पण त्यांनाही कायम स्मरणात ठेवते.आशा खाडीलकर, आरती अंकलीकर, देवकी पंडित यासारख्यांचे शास्त्रीय संगीत ऐकत रहावे असेच असते. जरी शास्त्रीय संगीत कळत नसले तरी त्यांची मेहनत, रियाज यांतून स्वरांचे महत्व मोहित करतेच. सुमन कल्याणपूर यांचा सुगम संगीताचा स्वर कोणी विसरू शकेल? आजच्या तरूण पिढीला आवडणारे ते रॅप संगीत हे पण स्वरांचे वेगळेपण जपणारेच. कुणाला काय आवडेल हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न पण कुठल्याच स्वरांनी प्रभावित होत नाही असा मात्र कुणी नसेल. अगदी सकाळचे फिरणे असो, व्यायाम असो, गृहिणींचे घरातील काम असो, स्वरांची सोबत असेल तर कसे सगळे जोशात पार पडते. आपले जीवनच स्वरांनी इतके व्यापून आहे की भावना प्रदर्शित करण्याचे ते एक माध्यमच आहे. स्वर फक्त गाण्यातच लागतो असे नाही तर अनेकांचा बोलण्याचा स्वर, शैली ही समोरच्याला खिळवून ठेवणारी असते. एखादा वक्ता जेव्हा व्यासपीठावरून बोलत असतो तेव्हा स्वरातील चढउतार, आवेश ही त्यांची जमेची बाजू असते. बाबासाहेब पुरंदरे, शिवाजी सावंत, पु ल देशपांडे ही काही उदाहरणे सर्वांना माहित असतात. या व्यक्ती बोलू लागल्या की प्रेक्षक तल्लीन होवून त्यांचे स्वर , शब्द मनात साठवून ठेवीत असत. आपले बोलणे नेहमी गोड असावे, कुणाच्याही मनावर उमटू नयेत चरे असे आपण जे ऐकत असतो ती स्वरांचीच तर जादू. पण ज्यांचे देवाने स्वरच हिरावून घेतले आहेत त्यांना काय वाटत असेल ही कल्पना ही फार क्लेशदायक आहे. तरीही त्यांचे आनंदाने जगणे पाहिले की वाटते - ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान.
No comments:
Post a Comment