Monday, 10 February 2025

स्वर - शुभांगी तपस्वी

घनमाला निळ्या सावळ्या डोंगर माथ्याशी थबकल्या...जलदीने जलधारा

रिमझिम बरसल्या...नाचरे निर्झर धावत सुटले...घुंगुर वाळ्यांचे स्वर आसमंती निनादले...

घाट माथा सरसर उतरले...भिजल्या मातीतून गंध दरवळला...

जलवंती रंगात मृण्मयीच्या रंगली.. दोन्ही काठांवर स्वरलता हिरवीगार सजली... बालिका वधू जराशी लाजली... वळण वाटांनी मुरकत चालली...घाटदार घाटाने पात्र तिचे विस्तारले...तरंग लाटांवर हलकेसे उठले...वार्‍यासंगे खेळण्यात तनमन गुंतले...

झुळूक स्पर्शाने रोम रोम मोहरला... थेंबोथेंबी जलकण आनंदाने उसळला...

लहरींचे लहरणे लाटांवर शहारले...मृदुल  करांनी जलतरंग छेडले...नाद मधुर कंकंणातून तुषार कण ओघळले...

आरसपानी सौंदर्य प्रतिबिंबीत झाले...आकाशी आकाश जळावर भाळले...आभाळातून थेट गाभार्‍यात पोहोचले...खोल अंतरंगाशी त्याने संधान सांधले...

मनाचा थांगपत्ता आभाळा गवसला...

नदीच्या मुखातून झंकार उमटला...

सागरा भेटावया प्राण आतुर झाला...

मिलनाचा क्षण समीप आला...अधीर मनाचा बांध फुटला...सागराशी एकरूप होता...जलौघ धन्य धन्य झाला...

जलचक्राचा खेळ खेळण्यात सृष्टीकर्ता रमा रमण रमला!!!




No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...