Monday, 10 February 2025

कृष्ण - राजश्री मानकर

 युगंधर-श्रीकृष्णास


गेल्या अनेक हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण या नावाचे गारूड सगळ्यांनाच प्रेमात पाडते आहे.त्याचे भक्त राधेकृष्ण म्हणत त्याचा जयघोष करीत असतात. खरतर राधा ही कृष्णाच्या बालपणातली त्याची सखी. कृष्णाने गोकुळ सोडल्यावर त्यांची परत कधी भेटही झाली नव्हती. गोकुळ सोडतांना मात्र तिने दिलेली वैजयंती फुलांची माळ आणि बासरी (मुरली) या दोन गोष्टी मात्र कृष्णाने सतत जवळ बाळगल्या. राधा या शब्दाचा अर्थ रा म्हणजे लाभो किंवा मिळो आणि धा म्हणजे मोक्ष किंवा जीवनमुक्ती. राधेकृष्ण म्हणजे त्याचे भक्त मोक्षाची मागणी करतात. श्रीकृष्णाचा जीवनप्रवास खरतर कळायला तितका सोपा नाहीये. त्याने जीवनाचे तत्वज्ञान जे अर्जुनाला कुरूक्षेत्र लढाईपूर्वी सांगितले तेच भगवत गीता. यातील विचार हे पिढ्यानपिढ्यांसाठी प्रेरक आहेत. जे आजही भक्तीभावाने अनेकजण अभ्यासतात, समजून आचरणात आणण्याचा प्रयत्न ही करतात. पण किती लोक? तर फारच थोडे. माणूस जसजसा प्रगती करत गेला तसतसे प्राचीन संस्कृती, विचार हे काहीसे मागे पडत चाललेत. खरतर आजकालच्या आधुनिक विज्ञानात जे शोध लागतायेत त्याविषयी आपल्या पुराणांत, वेदांत ही लिहीलेले सापडते आहे. मुळात संस्कृतीची, विद्वत्तेची महती जाणून घेण्यात आपण कमी पडतोय. असो. तर आज मला सांगायचे आहे ते फक्त श्रीकृष्णाविषयी. आपली कृष्णाशी पहिली ओळख होते तीच मुळात चालता-बोलता यायला लागले की लगेच. बहुतेक आया आपल्या मुलाला कृष्णासारखा पितांबर नेसवून, डोक्यावर मुकुट ठेवून, त्यात मोरपीस खोचून, हाती मुरली देवून त्याच्या त्या गोंडस देवस्वरूपातला एक तरी फोटो काढून घेतात आणि मग वर्षानुवर्षे ते कृष्णाचे रूप आपल्या मनाच्या गाभाऱ्यात पूजत असतात. मग आपण शाळेत जाऊ लागलो की कृष्ण पराक्रमाच्या कथा जणू आयुष्याचा अविभाज्य भाग बनून आपली सोबत करतात. शाळेत मग भगवत गीतेमधील अध्याय ही म्हणायला शिकविले जाते. पाठांतराच्या स्पर्धा होवू लागतात. त्या श्लोकांचा अर्थ त्या वयात कळत नसतो पण तरीही हे काहीतरी महान ज्ञान आहे याची जाणीव मात्र नक्कीच होते. मग महाभारतातील अनेक कथांमधून कौरव, पांडव, पितामह भीष्म, गुरू द्रोण, कर्ण, कुंती, धृतराष्ट्र, गांधारी, शकुनी इ. अनेक व्यक्तीरेखांशी ओळख होते परंतु मनात अढळपदी विराजमान होतो तो फक्त श्रीकृष्णच. कालीया मर्दन कथा,  कंसवध कथा, पुतना राक्षशिणीची कथा, गोवर्धनपर्वत कथा इ. अनेक गोष्टींमधून कृष्णाचे वेगळेच रूप मोहिनी घालते. तो प्रत्यक्ष देव जरी असला तरी मानवरूपात त्याने कृतीतून केलेले ते प्रबोधन होते. गोकुळात असतांना तोही सवंगड्याबरोबर खेळणे, खोड्या काढणे, गुरे राखणे हे सगळे करतच होता. पण संकटप्रसंगी युक्तीने कसा मार्ग काढायचा याची शिकवण ही वेळोवेळी द्यायचा. जितक्या सहजपणे त्याने गोकुळ, मथुरा, द्वारका या प्रत्येक ठिकाणचा त्याग केला हे पाहून वाटते अरे कशातही गुंतून पडू नये हेच तर त्याला सुचवायचे असेल का? मोह, माया या सर्वांतून अलिप्त रहाणे हाच खरा मोक्ष मार्ग आहे का? त्याच्या जवळच्या व्यक्ती म्हणजे पत्नी, मुले, सखे , नगरवासी या सगळ्यांवर त्याने जीवापाड प्रेम ही केले आणि अंतिम समयी कुणालाही न सांगता सगळ्यांचा सहज त्याग करून वनांत ही गेला.(भालका तीर्थ) जिथे एका व्याधाचा बाण लागून त्याचा मृत्यू झाला. कार्यभाग साधल्यानंतर सगळ्यातून बाहेर पडणे खरेच इतके सोपे असते का? द्वारका ही सुवर्णनगरी त्यानेच वसविली परंतु तो ना सिंहासनावर बसला ना युवराज म्हणून मिरवला. थोरलाबंधू बलराम, शेवटपर्यंत साथ देणारा उध्दव, सेनापती सात्यकी, त्याच्या गरूडधव्ज रथाचा सारथी दारूक, सखी द्रौपदी, भगिनी सुभद्रा, अभिमन्यू, अर्जुन या सर्वांवर त्याने मनापासून प्रेम केले. त्यांच्या सुखदुःखात समरस होवून सारे काही निभावून नेले. त्याच्या जीवनप्रवासात थोडी का संकटे आली? पण सगळ्यांना त्याच्याविषयी विश्वास होता काहीही झाले तरी तो यातून मार्ग काढील. सांज ये गोकुळी ,सावळी सावळी हे गीत ऐकतांना आधी फक्त भान विसरून ऐकावे असे वाटायचे पण श्रीकृष्णाविषयी अधिकाधिक वाचत गेले आणि मग त्याचे ते निळे सावळे गोकुळातील प्रसन्न रूप मनःपटलावर ठसा उमटवू लागले. बालपणी त्याने यशोदामातेला विश्वरूपाचे दर्शन मुखात घडविले या प्रसंगानंतर तर त्याच्या देवत्वाची छाप हळूहळू कळू लागली. त्याच्या पराक्रमाच्या तर अनेक कथा वाचल्या, ऐकल्या पण स्रियांविषयीचा आदर, सन्मान हा त्याने कृतीतून लोकांच्या मनावर बिंबविला होता. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी त्याच्याकडे सुदर्शन चक्राची अचाट शक्ती होती पण ती त्याने कधी ऊठ सूट वापरली नव्हती. शिशुपाल हा त्याचा आतेभाऊ, त्याला मारण्यापूर्वी त्याने दिलेला शब्द पाळला होता- जेव्हा याचे १०० अपराध होतील तेव्हाच मी याला ठार मारीन. या उदाहरणावरून तर कुठल्याही प्रसंगी संयमाने कसे वागावे याचा जणू त्याने पाठच घालून दिला नाही का? कौरव पांडवांमधील कुरूक्षेत्रावरचे महायुध्द हे जरी पांडवांच्या न्याय्य हक्कांसाठी लढले गेले होते तरी त्यामुळे झालेला विनाश हेच दर्शवितो की भावाभावांमधला सत्तेसाठीचा हव्यास हा विनाशकारीच असतो. या युध्दात श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले होते. सारथ्य फक्त रथाचेच नाही तर विचारांचे, जीवनाचेही. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, कर्ण, पितामह भीष्म या साऱ्यांची योग्यता तो जाणून होता. कुणालाही न दुखावता योग्य निर्णय घेणे अजिबात सोपे नव्हते पण ते ही त्याने लीलया केले होते. सांदीपनींच्या आश्रमात एकत्र शिकत असतांना गरीब सुदामाशी केलेली मैत्री त्याने शेवटपर्यंत निभावलीच पण सुदाम्याला कमीपणा वाटू नये याची ही काळजी घेतली. अशा अनेक प्रसंगांमधून त्याला जी शिकवण द्यायची होती ती त्याने कृतीतून जगासमोर मांडलीच होती. हे सारे समजण्याची कुवत मात्र ज्याची त्यानेच ओळखायला हवी. आपल्या भक्तांच्या हाकेला तत्परतेने तो धावून येतोच फक्त श्रध्दा मात्र हवी. त्याने हे ही सांगून ठेवले आहे की जगाला गरज असेल तेव्हा प्रत्येक युगात कुठल्या ना कुठल्या अवतारात येवून जगाचा उध्दार नक्की करेल. सध्याचे युग तर कलियुग आहे. भ्रष्टाचार, दुराचार, दांभिकता, बलात्कार यांसारख्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतांना दिसतायेत. हे श्रीकृष्णा हे सारे तर तूही पहात असशीलच पण तू योग्यवेळेची वाट पहात असणार. तरी रहावत नाही म्हणून विचारते- महाभारत काळी तुला एकट्या द्रौपदीला वस्त्रे पुरवावी लागली पण कलियुगात कित्येक अबलांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर  टांगली जातायेत त्यांना वाली कोण? सत्तेसाठी, पैशासाठी माणूस माणसालाच ओळखेना झालाय यांना वठणीवर आणणार कोण? अनेक ठिकाणी दहशतवादी कारवाया घडतांना दिसतायेत, त्यांना आळा घालून शांतता प्रस्थापित करणार कोण? जात-धर्मातील तेढ माणसांना विनाशाकडे घेवून जाते आहे, यांना थोपवणार कोण? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुझ्याशिवाय का मिळणार आहेत? गीतेत तू जे जीवनाचे सार सांगितले आहे, जे योग सांगितलेत ते तू पुन्हा अवतार घेवूनच साऱ्यांना समजावून सांगायलाच हवेत. सत्ययुगाचे जर निर्माण व्हायचे असेल तर हे सारे तुलाच करायला हवे ना? तेव्हा आता घे लवकरच मनावर. शेवटी एकच मागणे-

द्वार दया का जब तू खोले,

पंचम सूर में गूंगा बोले।

अंधा देखे, लंगडा चलकर पहॅंुचे काशी रे।

दर्शन दो घनश्याम मेरे ,

मोरी ॲंाखियॅंा प्यासी रे।

  ओम श्रीकृष्णार्पणमस्तु।


No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...