तू येतो आणिक....
गेलास तू परतुनी परदेशी अन
भिंती घराच्या झाल्या अबोल
प्रत्येक वस्तू आहे जणू स्तब्ध
या शांतीचे न वाटे मजला मोल
आई आई म्हणून मारलेली हाक
कानात घालीत असे सदा गुंजन
तुम्हा आवडीचे खाऊ घालण्यात
होत होते माझ्या मनाचे रंजन
लाभला सहवास मोठा तुझा
घरात होती सारखी गजबज
आत्या, काका, काकी अन
छोट्या भावंडांची होती लगबग
दादा वहिनी आले म्हणून सारी
भावंडे होती भारीच खुशीत
हास्य विनोद मौजमजेसह होती
खवय्येगिरीचा आनंद लुटीत
तुमच्या येण्याने साजरा झाला
प्रत्येक दिवस म्हणजे जणू सण
मित्रमंडळी,नातेवाईकांनी चढविले
त्या दिवसांना आनंदाचे कोंदण
'तू येते आणिक जाते' भाव हे
त्या गाण्यातील आज मज आठवती
फुलापरी उमलणाऱ्या त्या दिसांच्या
आनंदी कळ्या कायम आम्हां स्मरती
उद्यापासून होणार आता जरी
तुमची मोबाईलच्या स्क्रीनवर भेट
आहे आम्हापाशी तुम्ही ठेविलेले
अमूल्य असे आनंदी क्षणांचे हे बेट
No comments:
Post a Comment