दूर नभाच्या पल्याड माझे
नाव पुकारे कोण सारखे?
कोण खुणावे मला अवेळी?
सूर कुणाचे हलके हलके?
क्षितिजावरुनी भल्या पहाटे
किरणांसोबत येई कोणी
कानी माझ्या लागुनि आणिक
मूक स्वराने गाई गाणी
गाण्यामधुनी कथा ऐकवी
दूर देशिच्या अद्भुत सुंदर
स्वप्न असे की सत्य कळेना
गोष्ट ऐकता मजला नंतर
कथा संपता भरून राही
एक अनामिक मनात ओढ
क्षितिज लंघुनी पल्याड जावे
हीच एकली इच्छा गाढ
आणिक जाउन असा पोचलो
क्षितिजाच्याही पल्याड जेव्हा
वळुन एकदा साद घातली
मीच माझिया मनास तेव्हा
No comments:
Post a Comment