सुरुवात करू ही नव्याने
करूया आता नवी सुरुवात, तोरण बांधून दारात
गुढी ही चैतन्याची, जणू काही ती पर्वणीच सुखाची
सुरू झाले नवीन मराठी वर्ष, स्वागत करूया सर्वे मिळून सहर्ष,
मराठी वर्षाचे पहिले पान चैत्राचे, या वर्षवृक्षावर फुल उमलू दे मैत्राचे
नवी सुरुवात करायची पण ती कशी ह्या प्रश्नामध्येच अनेकजण हे फसलेले दिसून येतात. त्यासाठी अनेक तर्कवितर्क, विचार, प्रश्न, उत्तरे, गोंधळ असे सर्वांचे मिश्रण एकत्रितपणे आपल्या मनामध्ये दाटून येते. या सर्व मिश्रणातून तोडगा म्हणून आपल्याला मुक्तता हवी असते आणि ती मिळते आपल्याला हव्या असलेल्या नव्या सुरुवातीने..
खरं तर सुरुवात आपण कोणत्याही क्षणी करू शकतो फक्त त्या सुरुवातीला सोबत हवी असते ती योग्य आणि मजबूत अशा मनोधैर्याची.. जर हे साहित्य आपल्याकडे उपलब्ध असेल, तर नव्हत्यातल्या गोष्टी देखील करून दाखवण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आणि हे आपण जितक्या लवकर जाणून घेऊ तितक्याच लवकर आपल्यासाठी गोष्टी या सहजसोप्या होऊ शकतील.
काही जण नवीन सुरुवात करण्यासाठी कोणत्याही गोष्टीची वाट बघत बसत नाहीत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली की, ती ते करून मोकळे होतात. तर काही जण हे योग्य वेळेची, योग्य दिवसाची तर काही वेळा योग्य मुहूर्ताची वाट पाहतात आणि तो दिवस आला की, त्यांच्या महत्वाच्या कामांचा श्रीगणेशा करतात. काही वेळा त्यांचा यामागचा हेतू हा पुढे भविष्यात जाऊन या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे किंवा नव्या सुरुवातीला शुभ दिवसाची सुंदर किनार देणे हा असतो. याद्वारे त्यांची ही नवी सुरुवात ही अविस्मरणीय होण्यास मदत होत असते.
कोणत्याही व्यक्तीने केलेली नवीन सुरुवात ही त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. नवीन सुरुवातीकडे पाहायचा प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन त्या व्यक्तीला त्या कामामधून मिळणारे यश ठरवत असतो. ते म्हणतात ना की, कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी त्या गोष्टीची योग्य सुरुवात करणे हे महत्वाचे असते.
कधीकधी असे होते की, आपण ठरवल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीची सुरुवात होत नाही. पण अशा वेळी वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण त्या गोष्टीमध्ये पुढे जाऊन कसे यशस्वी होऊ याबद्दल नेहमी विचार करायला हवा. तसेच नुसता विचार न करता त्या गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी त्या दृष्टीने कृती देखील करायला हवी.
यंदा ९ एप्रिल, २०२४ रोजी गुढीपाडव्यासारख्या सुंदर दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे. त्यादिवशी अनेकांनी त्यांच्या नवीन कामाची नवीन सुरुवात केलेली असेलच. त्यांचे ते काम तडीस नेण्यासाठी त्यांना योग्य ते बळ व मनोधैर्य मिळू देत.
कोणीही त्यांची नवीन सुरुवात करताना आपण आपल्या आयुष्यात आधी झालेल्या चुकांमधून काय शिकलो आहोत हे नेहमी स्मरणात ठेवायला हवे. त्या चुका आपल्या हातून पुन्हा होणार नाहीत याची योग्य ती काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.
गुरू ठाकूर सरांनी त्यांच्या सुंदर शब्दात जुन्या गोष्टींमधून नव्या गोष्टींकडे होणारे संक्रमण हे शब्दबध्द केलेले आहे. ते म्हणजे,
रीत म्हणूनी पुढेही जाणे भागच आहे राहून गेले मागे नक्की काय स्मरेना मिटली जरी दारे सगळी सरत्या वर्षाने तरीही ह्या पायरी वरूनी पाय निघेना...
ही कविता वाचून नक्कीच जुन्या आठवणींना उजाळा दिल्यासारखे होते. पण या जुन्या आठवणींना दिलेला उजाळा आपल्याला भविष्यातील आठवणी आणखीन अविस्मरणीय करण्यास मदत करत असतो. सर्व गोष्टी एकत्रितपणे सामावून घेऊन जो माणूस एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो, ती सुरुवात खऱ्या अर्थाने नवी सुरुवात आहे.
No comments:
Post a Comment