Monday, 10 February 2025

सखी सांजवेळी - विद्याधीश

 सखी सांजवेळी

(वृत्त : भुजंगप्रयात)


सखी सांजवेळी, रवी अस्त होता

क्षणी मूक होता, पसारा दिशांचा

नको लाजुनी तू, अशी गोड हासू

नको रक्तिमा लेवु गाली नभाचा


सखी सांजवेळी, नभी खेळ चाले

खगांचे थवे गात येता घरास

नको मुग्ध वीणेपरी गीत गाऊ

नको येउ ऐशी अवेळी भरास


सखी सांजवेळी, अशा गूढ काळी

घुमे वात निःशब्द जेव्हा दरीत

नको धाव घेऊस खोट्या भयाने

नको क्लांत होऊन येऊ मिठीत


सखी सांजवेळी, दडे शुक्र तारा

— तुला पाहुनी. सावळी तारका तू

नको सांज त्याची हिरावून घेऊ

नको तेज त्याचे असे झाकळू तू


सखी सांजवेळी, झरे मंद धार

भरे कस्तुरीचा सभोती सुगंध

नको लाजवू त्या सुगंधास ऐशी

फुलोनी नको येउ ऐशी सगंध


सखी सांजवेळी, तुझा हात हाती

धरोनी पहाता तुझ्या लोचनात

नको खोल डोहात खेचुन घेऊ

नको अमृताचे गडे पाजु घोट



No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...