कट्टा म्हणा नाका म्हणा अड्डा म्हणा किंवा स्पॉट म्हणा
कुणी काही म्हटल्याने फरक कुठे पडतो
मित्र एका मित्राला तिथेच खरा भेटतो!
कट्ट्यावर भेटू म्हणताना किती सिक्युअर वाटतं सांगू
आई मात्र नेहमी म्हणते उगीच तिथे नको थांबू
कसं सांगू आई तुला तिथे काय गंमत असते
भरभरून बोलता येतं
मन मोकळं करता येतं
कुणाचं हृदय जुळतं
कुणाचं चक्काचूर होतं
कुणी बोलूच देत नाही आई
बाबांसारखा
कुणी समजून घेतो मनापासून
तुझ्यासारखा
घरात कधीच कट्टा नसतो
कट्ट्यावर मात्र घर असतं
खरं सांगतो आई तुला
कट्ट्यासाठी वाटेल ते
तू सुद्धा ये तिथे
तुला सुद्धा पटेल ते
हो पण आई, आमच्या गप्पा ऐकू नकोस
तुला भाषा झेपणार नाही
आमच्या तसल्या नजरांमधला
तुला अर्थ कळणार नाही
एक सांगतो आई तुला
तू टेन्शन उगीच घेऊ नकोस
यांच्यात राहून वाया जाईन
असं उगाच समजू नकोस
जिवलग असो वा परका असो
मित्र शेवटी मित्र असतो
मैत्री अधिक घट्ट असावी
म्हणून फक्त कट्टा असतो
- ऋग्वेद
No comments:
Post a Comment