‘ लाभले आम्हास भाग्य...’
‘ जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी..’ असे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने आपल्या आईचा आणि मातृभूमीचा गौरव करताना म्हटले आहे. त्यात आपल्या मातृभाषेचा समावेश करायला हरकत नाही. ज्ञानेश्वर माउलींनी तर म्हटलेच आहे-
माझा मऱ्हाटाची बोलू कवतुके
परी अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन.
मराठी भाषेतील थोर लेखक, कवी, नाटककार कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिन म्हणून जगभर साजरा होतो. जगाच्या कान्याकोपऱ्यात जिथे कुठे मराठी माणूस असेल तो अभिमानाने हा दिवस साजरा करतो. मराठीची आठवण करतो, मायभूमीची आठवण करतो. ही मराठी माती इतकी पवित्र आहे की कुसुमाग्रज म्हणतात
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्याखोऱ्यातील शिळा.
मराठी भाषेतील अभंग असो वा ओवी, तिला सुभाषिताचे मोल प्राप्त झाले आहे.
रत्नजडीत अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णातुनी फिरे, सरस्वतीची पालखी.
या आमच्या मायमराठीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. या अर्थाने माझी मराठी ऐतिहासिक आहे, अक्षर आहे, अभिजात आहे. आई जसे आपल्या बालकाचे पालनपोषण करते, तसे या मराठीने तुमचे आमचे पोषण केले आहे. हजारो वर्षांपासून. ते स्तन्य पाजून तिने आपल्याला बळ प्रदान केले आहे. आपले सांस्कृतिक वैभव वाढवले आहे. तिच्या अंगाखांद्यावर खेळतच आपण मोठे झालो आहोत. मग तिला कसे विसरता येईल...
माधव ज्युलियन यांच्या शब्दात सांगायचे झाले तर
मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे.
नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे.
हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू, वसे आमुच्या हृन्मंदिरी.
जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे, हिला बैसवू वैभवाच्या शिरी.
ही नैतिक जबाबदारी आज तुमच्या आमच्यावर आहे. कारण आम्ही तिचे वारस आहोत.
संस्कृत भाषेतून उगम पावलेली, प्राकृतापासून विकसित झालेली ही मराठी. सातवाहन राजांच्या काळापासून वापरात आली, यादव राजांच्या काळात ती भरभराटीस आली. अनेक संत, कवी, लेखकांनी तिला सुंदर लेणे चढवले. त्यातून ती अधिकच श्रीमंत, ऐश्वर्यसंपन्न होत गेली. विवेकसिंधू हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिला. म्हणून ते आद्य कवी. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील ज्ञान भांडार मराठीत आणून सर्वसामान्यांसाठी खुले केले. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, हरिपाठ आदी ग्रंथ लिहून मराठी भाषेला इतके सामर्थ्य प्राप्त करून दिले की खरोखरच ती ‘ अमृतातेही पैजा ‘ जिंकेल. आणि खरोखरीच इतकी सुंदर भाषा त्यांनी वापरली की ओवी असावी तर ज्ञानेशाची असे म्हटले जाऊ लागले. अखिल विश्वासाठी इतके सुंदर पसायदान ज्ञानेश्वर माउलींनी मराठीत मागितले की ते मराठीचे एक अभिमानाचे अक्षर आणि अमर लेणे झाले.
पुढे संत एकनाथ, समर्थ रामदास, संत तुकाराम, संत नामदेव आदी संतानी नानाविध ग्रंथ लिहून मराठीला आणखी समृद्ध केले. शिवरायांच्या नेतृत्वाखाली ‘ मराठी पाऊल पुढे पडले.’ आणि मायमराठीला राजाश्रय लाभला, लोकाश्रय लाभला. मराठी भाषेला मराठी मातीचा गंध लाभला. अंगावर रोमांच उभे करणारे शूरवीरांचे पोवाडे लिहिले गेले, लावण्या लिहिल्या गेल्या. संत कवी, पंत कवी यांनी मराठीला समृद्ध केले. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, स्वा सावरकर, आगरकर, म. फुले, न्या. रानडे, लोकहितवादी, साने गुरुजी, विनोबा भावे आदींच्या साहित्याने मराठी भाषेला अधिक श्रीमंत केले.
खान्देशच्या मातीत जन्मलेल्या बहिणाबाई, बालकवी आदींच्या कवितांनी तर रसिकांच्या मनावर कायमचे गारुड केले. अशिक्षित असलेल्या बहिणाबाई अहिराणीत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून गेल्या, तर बालकवींनी आपल्या कवितांमधून रंगांची आणि निसर्ग सौंदर्याची उधळण केली. आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, राम गणेश गडकरी, वि वा शिरवाडकर, वि स खांडेकर, गो नि दांडेकर, ना सी फडके, मंगेश पाडगावकर, बा भ बोरकर, भा रा तांबे आदी कवी आणि लेखकांनी अक्षर मराठी साहित्य निर्मिती केली. मराठीतील वाल्मिकी म्हटल्या जाणाऱ्या ग दि माडगुळकर यांनी अक्षर अमर गीतरामायण लिहिले. केवढी थोर साहित्यिकांची मांदियाळी आहे मराठीत ! नावे तरी किती घ्यावीत ! अशा या वेगवेगळ्या कवी आणि लेखकांनी मराठी भाषेला समृद्ध केले आहे.
तरी आज अशी वेळ का येते की आम्हाला म्हणावे लागते की मराठी भाषा जगवली पाहिजे, वाढवली पाहिजे ? त्याचे कारण आम्ही तिचे पुत्र आहोत, तिचे वारस आहोत, तिचे पांग आम्हाला फेडायचे आहेत हे आम्ही कुठेतरी विसरतो. वर्षभरातून एकदा मराठी दिवस आला की आम्हाला मराठीचा अभिमान उरी दाटून येतो. पण पुन्हा वर्षभर गायब ! आमच्या मुलांना आम्ही अट्टाहासाने इंग्रजी शाळेत घालतो. मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत.
इंग्रजी भाषा म्हणून शिकणे आजच्या काळासाठी आवश्यक आहेच याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण यासाठी मातृभाषेचा बळी द्यायला हवा का याचा विचार आपण करणार आहोत की नाही ? मावशीसाठी आईचा बळी द्यायचा का ? आम्ही आमच्या मुलांना आता ‘ चिऊ काऊ ‘ नाही शिकवत. आमचा काऊ म्हणजे आता गाय. चिऊ म्हणजे sparrow. भू भू म्हणजे कुत्रा नाही. आता डॉगी म्हटले जाते. ‘ आई ‘ म्हणुनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी. पण ती हाक आता नाही येत कानी. जिकडे तिकडे ‘ मम्मी शब्द कानावर पडतो. इंग्रजीत प्रेताला मम्मी म्हणतात. मम्मी म्हणताना ओठ मिटले जातात तर आई म्हणताना तोंड उघडले जाते. आ होतो. केवढा मोठा फरक ! ‘ टी व्ही वरच्या साबणाच्या एका जाहिरातीत एक छोटी मुलगी आपल्या आईला ‘ मम्मी ‘ म्हणून हाक मारते. आणि मग ‘ किती सुंदर आहे. She is so talented.’ मम्मी सुद्धा, रॉक स्टार सुद्धा असे इंग्रजाळलेले उद्गार कानी येतात. मोबाईलवर मराठी टाइप करताना मराठीचे जे काही खून पडतात ते तर भयानकच ! ऱ्हस्व, दीर्घ तर अजून पुढचा भाग...! त्याबद्दल मी इथे जास्त बोलत नाही.
म्हणून आमच्या मुलांना आवर्जून मराठी शाळेत टाकले पाहिजे. त्यांना सुदर मराठी पुस्तके वाचायला दिली पाहिजेत. त्यांची गोडी लावली पाहिजे. आधी आपण पालकांनी लावली पाहिजे. मराठी पुस्तके विकत घेऊन वाचली पाहिजेत. मराठी बोला, मराठी चाला, मराठी खा, मराठी प्या, मराठी झोपा, मराठी जागा, मी मराठी, बाणा मराठी, जात मराठी, पंथ मराठी, धर्म मराठी असे अंतर्बाह्य मराठीमय व्हा. आता होळी येते आहे. तेव्हा असा ‘ असा अवघा रंग एक झाला..’ पाहिजे. ती खरी होळी. असे जेव्हा होईल तेव्हा मराठी जगेल, वाचेल, वाढेल. फक्त मराठी दिन साजरा करून नाही भागणार.
सुरेश भटांच्या ओळींनी शेवट करू या
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी.