लाट
लाट वेगे वेगे येई
सवे घेऊन भरती
हळू हळू जाई मागे
लाट सरता ओहोटी
मन माझे लाट जणू
तिच्यासारखेच वागे
भावनांचे येणे जाणे
कधी हळू, कधी वेगे
कधी सुखाची भरती
कधी दुःखाची ओहोटी
दोन्ही वेळा मन माझे
लाटे सम या तरंगे
काही लिहिलेले मनी
लाट नेई ते वाहून
काही नको असताना
येई सवे ते घेऊन
मन माझे लाट लाट
सदा देई माझी साथ
कधी वाहत जाताना
ओढे धरून हा हात
मन स्वार तिच्यावरी
करी जगाची सफर
मन हलके पिसापरी
भरे आनंदें हा ऊर
No comments:
Post a Comment