प्रेमाच्या लाटेत वाहून जायचं,
शृंगाराच्या लाटात चिंब भिजायचं,
वेदनांच्या लाटांमधून जन्म घ्यायचा,
उचंबळून येणार्या भावनांच्या लाटा कधी अडवायच्या,
कधी अंगावर घ्यायच्या,
विचारांच्या लाटांना प्रयत्नपूर्वक बांध घालायचा!
सुखाच्या लाटांवर अलगद तरंगायचं,
दुःखाच्या लाटांवर स्वार होऊन त्यांना मागे ढकलायचं!
संकटांच्या लाटांशी कसलेल्या नावाड्यासारखं झुंजायचं,
अन् अंतिम क्षणी जन्मवेळच्या वेदनांच्या लाटाच नशिबी आल्या तर त्यातच मिसळून जायचं!
जन्म-मृत्यु,दोन्ही वेळच्या लाटा सुटकेच्याच,
जन्मवेळी आईची शारिरीक सुटका,
बाळाची नऊ मासांच्या बंदीवासातून सुटका!
भवसागरातल्या ह्या लाटा म्हणजेच जीवन,
जीवनाची अंतिम लाटेत विलीन होणं म्हणजे
ह्या सर्व लाटांच्या भोवर्यातून सुटका !
No comments:
Post a Comment