भेट
या प्रसंगी काय 'भेट ' देऊ तुला ? खरं तर हा अडचणीत टाकणारा प्रश्न...
पण ' भेट ' या शब्दातच उत्सुकता आहे.
लहान मुलांना काही भेटवस्तू मिळाली ,तर त्यांच्या चेहर्यावरचा आनंद आठवा जरा...
आपली मराठी भाषा अत्यंत समृद्ध आहे. एखादा शब्द आपण विविध प्रकारे वापरू शकतो. हा भेट शब्दच बघाना.
लहानपणीचा एखादा मित्र/मैत्रीण अनपेक्षित पणे अनेक वर्षांनी भेटले ,तर त्या भेटीचा आनंद अवर्णनीय असतो.
'भेटशील तू नव्याने' अशी आशा बाळगणारा प्रियकर
प्रेयसीच्या भेटीची आस लावून असतो.
उतार वयात नव्याने मित्र/मैत्रीणी जोडले जातात,
प्रभातफेरीच्या निमित्ताने भेटत राहतात.
नवराबायको, मित्र-मैत्रीणी
प्रसंगानुरूप एकमेकांना भेटवस्तू देतातच..
अनेक दिवसांनी एकत्र आल्यावर 'पुन्हा भेटूया ग'
असं म्हणून निरोप घेतला जातो. रोज ऑफिसमधे भेटणाऱ्यांना सुद्धा दुसर्या दिवशीच्या भेटीची ओढ असतेच की.
परमेश्वर भेटीची आस लागायला आपण काही साधु-संत नाही.
परमेश्वरालाच जेव्हा आपल्या भेटीची इच्छा होईल, तेव्हा निमूटपणे त्याच्यामागे चालू लागणारे पामर आपण....असो..
पण वाईट या गोष्टीचं वाटत की सध्या हा शब्द
सर्रास चुकीच्या पद्धतीने वापरला जातो...पेन भेटला, पत्ता नाय भेटला....
अरे,वस्तू मिळतात..माणसं भेटतात..असं घसा फोडून सांगावसं वाटतं
' मराठी 'ला अभिजाततेचा दर्जा यासाठीच मिळाला का ?
No comments:
Post a Comment