कृष्णस्पर्श...**
पहाट झाली यामुनेकाठी
धुक्यात घुमतो मंजुळ पावा
लोहगोल ये क्षितिजा वरती
राधा स्मरते मन्मनी रावा
पारावरची भेट कालची
क्षण क्षण राधा स्मरे माधवा
स्पर्श आठवे अंग थर थरे
हृदयामध्ये गोड कालवा
तिन्हीसांजेची मुग्ध वेळ ती
तिरक्या होत्या लांब सावल्या
पाऊलवाटा गवता मधल्या
सोनेरी किरणांनी भारल्या
तेच किरण सोनेरी तनुवर
होती चमकत काया सुंदर
कणकण अंग कनकचि झाले
जिथे स्पर्शला तो मुरलीधर
जागृती येता तिजसी कळले
सत्य नव्हे ते स्वप्न खरेतर
तन मन अवघे व्यापून उरला
राधे हृदयी तो हृदयेश्वर...
No comments:
Post a Comment