रंगसखा रंगिला
रंगासवे रंगला
राधाधर सावळा
रासरंगी दंगला
घननीळा धूम्रवर्णी अवकाश मंडळातून अलवार रेशीमधारा छेडीत श्रावणात बरसतो... तेंव्हा नादमधुर सानिका अधराशी धरून नादसखा नादामध्ये नादावतो...धुंद धारात चिंब चिंब भिजतो...अवनीच्या ओल्या कुशीत ओलेता ओलावतो,मृदगंधात गंधावतो...
माया,ममतेच्या मृदु,मुलायम पदराखाली थेंब न थेंब झिरपतो...हिरवा गर्द मोरपिसारा हळूहळू आसमंतात फुलतो,परिसर गर्भरेशमी गर्भाळतो... पुलकीत झालेली सृष्टी नव्या नव्हाळीत रूजलेले,मोरपंखात वसलेले एकेक रंग बावरे रंगधनू उलगडत,उमलवत विविधांगी प्रसवते...
आकाश निळाईतून हिरवाई प्रगटते...हे रंगसंगतीत रंगलेले,गंधलेले ऋतुगंध उधळीत निसर्गदेवता प्रकृती पुरुषाच्या मनोमिलनाचे भावगर्भी भावनांचे एकेक स्तर उत्कटपणे मनामनात रूजवते...ही ऋत्वीक ऋतुजा ऋतुपरत्वे वेगवेगळे साज इतक्या सहज सुलभ रीतीने बदलते...सार्या रंगात रंगून ती नाविन्याच्या उन्मेषात रममाण होते...ही राधाधराची अविरत वाहणारी धारा तीच राधा वसंतोत्सवात,होळीच्या रंगोत्सवात सुगधी सुवासात परिमळते...रासक्रीडा वृंदावनी खेळण्यात खेळीयाड दंग होतात...राधाकृष्णाची ही अमरप्रेम कहाणी युगानुयुगे प्रीतरंगात आकंठ डुंबलेली असते...कृष्णाच्या शिरपेचात मोठ्या प्रेमाने खोचलेले भावस्पर्शी मोरपंखी मोरपीस प्रीतगंध जागवते गंधवेल फुलवते...होळीच्या नवरंगात रंगोत्सव उजळते...!!!
No comments:
Post a Comment