ती
ती आहे म्हणुनी विश्व भासते सुंदर
अन् स्वर्गच फुलतो वावरताना घरभर
सहचरी सखी ती कन्या भगिनी पळभर
हृदयात उसळतो मातृत्वाचा सागर !
तनु कोमल नाजुक म्हणती सारे अबला
हळुवार बोलुनी मोहविते ती सकला
ही स्वप्नामधली नुरली आता बाला
होणार अता ती स्वयंसिद्ध अन् सबला !
सोसुनी विखारी चटके आयुष्याचे
उघडते नवनवे दालन ती ज्ञानाचे
आचार विचारी वारे प्रगल्भतेचे
बळ देते तिजला तिच्यात विश्वासाचे !
गगनात घेउनी उंचच उंच भरारी
धडपडते परी न फिरते ती माघारी
ती सत्याची अन् न्यायाची कैवारी
चंडिका कालिका दुर्गा तारणहारी !
प्रश्नांना लाखो देते रोजच उत्तर
अस्तित्वासाठी युगायुगांचा संगर
रूपात तिच्या नवदुर्गांचा नित वावर
अंतरी चालतो दिव्य शक्तिचा जागर !
No comments:
Post a Comment