पाण्यासारखं होता आलं पाहिजे
मनुष्याला पाण्यासारखं होता आलं पाहिजे
परिस्थतीनुसार वाहता आलं पाहिजे
याचा अर्थ असा नव्हे की दुसरा म्हणेल
तसं आपल्याला वागता आलं पाहिजे
पाण्यालाही असतात आपले असे गुण
ते जपूनच स्वतःला वळवता आलं पाहिजे
उतारावर वेगात, चढावर धीम्याने साचत
पत्थरांना फोडून पार जाता आलं पाहिजे
नदी होऊन मनमोकळं बागडताना देखील
डोह होत खोल गंभीर होता आलं पाहिजे
सतत सहन करणं मुळीच नसलं सोपं तरी
घाव सोसूनही एकसंध राहता आलं पाहिजे
आपली ओळख जपून समोरच्याचं बिंब
जशास तसं त्याला दाखवता आलं पाहिजे
समुद्रासारखं सामावून घेताना सारंकाही
ओंजळीमध्ये स्वतः सामावता आलं पाहिजे
माणसानी पाण्यासारखं झालं पाहिजे
शांत रहात, प्रसंगी उसळता आलं पाहिजे
No comments:
Post a Comment