हनुमंताची कोटीच्या कोटी उड्डाणे फक्त आरतीत माहिती असणारी आमची पिढी आणि तशी कोटी उड्डाणे करून यानाने अवकाशमार्गे चंद्रावर,
मंगळावर पोहोचता येतं,हे अनुभवणारी आजची पिढी.सध्या आपण फक्त टी.व्ही.वर बघतो आहोत,
पण असं उड्डाण आपणही अनुभवू शकतो,असा विश्वास मात्र नक्की वाटायला लागला आहे.
अंकलिपी शिकायला लागल्यावर हजारही खूप वाटायचे.लाख म्हणजेही किती ते मोजताना एकावर किती शून्य द्यायची,असा विचार पडायचा.कोटी तर फारच दूरची गोष्ट.कोटीचा आणि आपला कधीही संबंध येणार नाही,ह्याची पक्की खात्रीच होती.पण बघता बघता घरांचे भाव हजारो,लाखो करत किमान एक कोटीपर्यंत कधी कसे गेले,ते कळलेच नाही आणि आता वाटतं,इथे बरेच जण कोट्याधीश आहेत की!
शाब्दिक कोट्यांशी आमची खरी ओळख आपले सर्वांचे लाडके भाई,पु.ल. देशपांड्यांमुळे झाली आणि जवळ जवळ दोन पिढ्यांना ह्या शब्दांनी कोट्यावधी वेळा हसविले आणि आयुष्य समृद्ध केले.म्हणून तर त्यांना "कोट्याधीश पु.ल."म्हणतो आपण.
एक कोटीचं आर्थिक मूल्यही आता फार वाटेनासं झालं आहे,इतका तो शब्द रोज कानावर पडतो आहे. "कौन बनेगा करोडपती" खेळ कोटीपर्यंत पोहोचलेली व्यक्ती क्षणात कशी खाली येते,हे दाखवते आणि सावकाश,स्थिरचित्ताने खेळत कोटीपर्यंत पोहोचता येते,हेही दाखवते.
कोटी आर्थिक असली तर तिचं महत्व प्रत्येकासाठी वेगळं असतं. शाब्दिक कोटी करण्याचा आनंद वेगळा असतो,ऐकण्याचा आनंद वेगळा असतो.
कोटी उड्डाणे करण्याचा आनंद फक्त विमानाच्या पायलटलाच समजत असतो.
कोटी जप,कोटी कोटी प्रणाम, मोजता येतात.पण कोटी कोटी सूर्यकिरणे,
आकाशातून बरसणार्या कोट्यावधी जलधारा कधी कोणी मोजल्या आहेत? तरी आपण म्हणतोच ना!
आपल्याकडे कोटी रु.ची संपत्ती नसली,तरी शाब्दिक कोटी वाचून,ऐकून किंवा स्वतः करून खळखळून हसू शकतो.आनंदाची देवाण घेवाण तर कोट्यावधीवेळा करू शकतो ना! ती तरी जरूर करावी.
No comments:
Post a Comment