Monday, 10 February 2025

तिन्ही सांजा - प्रज्ञा कोरडे

 तिन्ही सांजा


सळसळ पिंपळावरून 

ऊन उतरलं खाली 

सोनवर्खी आंगण 

दिसू लागलं भरजरी 


भरजरी अंगणाला 

किरणांची नक्षी 

उडून जातील दूर 

पांढऱ्या उन्हाचे पक्षी


सांजेच्या रंगांची 

क्षितिजावर दाटी

धुसर काळोख धरून

रात्र उतरेल पाठी


तिन्ही सांजा अशा

दारात लागतील विसावु

कातर कातर मन मग 

लागेल काही बाई आठवु


सुटलेले काही थोडे 

सांधायचे होते 

तिन्ही सांजा होण्याआधी 

जगायचे होते 


स्वर - राजश्री मानकर

 स्वर

स्वरांची दैवी देणगी लाभलेल्या अनेक महान व्यक्ती आपल्या सर्वांच्याच आवडीच्या, आदरणीय असतात. मंगेशकर घराणे तर सरस्वतीचा वारसा लाभलेले. लता दीदी असोत, आशाताई असोत, उषा ताई असोत, प्रत्येकीच्या गळ्यातल्या स्वराचे सामर्थ्य वेगळे. रसिकांना मात्र सगळेच स्वर भावणारे, रिझवणारे. एकासारखे दुसरे नाही तरी प्रत्येक स्वर हा भुरळ घालणाराच. कुणाचा स्वर सुगम संगीतासाठी चांगला लागतो, कुणाचा स्वर शास्त्रीय तानांमधे फिरतो, कुणाचा स्वर भूपाळ्या, स्तोत्रांमधे निनादतो, कुणाचा स्वर लावणीवर ठेका धरायला लावतो तर कुणाचा ईश्वर आराधनेत तल्लीन करतो. किती हे स्वरांचे वेगळेपण आणि हे दैवी देणे लाभलेले किती महान कलाकार , जे आपल्या कलेच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात. भीमसेनजींच्या भूपाळ्यांनी अगदी देवालाही जाग येत असेल. सुबलक्ष्मींची स्तोत्रे किती गोड आळवणी करणारी, किशोरकुमार, मोहम्मद रफी यांच्या  स्वरांची जादू रसिकमनांवर सतत गारूड तर करतेच पण त्यांनाही कायम स्मरणात ठेवते.आशा खाडीलकर, आरती अंकलीकर, देवकी पंडित यासारख्यांचे शास्त्रीय संगीत ऐकत रहावे असेच असते. जरी शास्त्रीय संगीत कळत नसले तरी त्यांची मेहनत, रियाज यांतून स्वरांचे महत्व मोहित करतेच. सुमन कल्याणपूर यांचा सुगम संगीताचा स्वर कोणी विसरू शकेल?  आजच्या तरूण पिढीला आवडणारे ते रॅप संगीत हे पण स्वरांचे वेगळेपण जपणारेच. कुणाला काय आवडेल हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न पण कुठल्याच स्वरांनी प्रभावित होत नाही असा मात्र कुणी नसेल. अगदी सकाळचे फिरणे असो, व्यायाम असो, गृहिणींचे घरातील काम असो, स्वरांची सोबत असेल तर कसे सगळे जोशात पार पडते. आपले जीवनच स्वरांनी इतके व्यापून आहे की भावना प्रदर्शित करण्याचे ते एक माध्यमच आहे. स्वर फक्त गाण्यातच लागतो असे नाही तर अनेकांचा बोलण्याचा स्वर, शैली ही समोरच्याला खिळवून ठेवणारी असते. एखादा वक्ता जेव्हा व्यासपीठावरून बोलत असतो तेव्हा स्वरातील चढउतार, आवेश ही त्यांची जमेची बाजू असते. बाबासाहेब पुरंदरे, शिवाजी सावंत, पु ल देशपांडे ही काही उदाहरणे सर्वांना माहित असतात. या व्यक्ती बोलू लागल्या की प्रेक्षक तल्लीन होवून त्यांचे स्वर , शब्द मनात साठवून ठेवीत असत. आपले बोलणे नेहमी गोड असावे, कुणाच्याही मनावर उमटू नयेत चरे असे आपण जे ऐकत असतो ती स्वरांचीच तर जादू. पण ज्यांचे देवाने स्वरच हिरावून घेतले आहेत त्यांना काय वाटत असेल ही कल्पना ही फार क्लेशदायक आहे.  तरीही त्यांचे आनंदाने जगणे पाहिले की वाटते - ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान.


स्वर - शुभांगी तपस्वी

घनमाला निळ्या सावळ्या डोंगर माथ्याशी थबकल्या...जलदीने जलधारा

रिमझिम बरसल्या...नाचरे निर्झर धावत सुटले...घुंगुर वाळ्यांचे स्वर आसमंती निनादले...

घाट माथा सरसर उतरले...भिजल्या मातीतून गंध दरवळला...

जलवंती रंगात मृण्मयीच्या रंगली.. दोन्ही काठांवर स्वरलता हिरवीगार सजली... बालिका वधू जराशी लाजली... वळण वाटांनी मुरकत चालली...घाटदार घाटाने पात्र तिचे विस्तारले...तरंग लाटांवर हलकेसे उठले...वार्‍यासंगे खेळण्यात तनमन गुंतले...

झुळूक स्पर्शाने रोम रोम मोहरला... थेंबोथेंबी जलकण आनंदाने उसळला...

लहरींचे लहरणे लाटांवर शहारले...मृदुल  करांनी जलतरंग छेडले...नाद मधुर कंकंणातून तुषार कण ओघळले...

आरसपानी सौंदर्य प्रतिबिंबीत झाले...आकाशी आकाश जळावर भाळले...आभाळातून थेट गाभार्‍यात पोहोचले...खोल अंतरंगाशी त्याने संधान सांधले...

मनाचा थांगपत्ता आभाळा गवसला...

नदीच्या मुखातून झंकार उमटला...

सागरा भेटावया प्राण आतुर झाला...

मिलनाचा क्षण समीप आला...अधीर मनाचा बांध फुटला...सागराशी एकरूप होता...जलौघ धन्य धन्य झाला...

जलचक्राचा खेळ खेळण्यात सृष्टीकर्ता रमा रमण रमला!!!




स्नेह - वनजा देव


मैत्रीच्या पायर्या चढताना

पहिली पायरी परिचयाची,

दुसरी पायरी ओळखीची!

जुळतात त्यातून काही घट्ट मैत्र,

काही होतात नकळत त्रयस्थ!

मैत्रीमध्ये मिळत असली जरी सर्व नाती,

तरी स्नेहासाठी गरज नसते

जुन्या घट्ट मैत्रीची!

स्नेहामध्ये असतो परस्परांप्रती मान,

कुणाचे तरी स्नेहांकित असण्याचा 

वाटतो अभिमान!

मित्र आणि स्नेही

एकाच नाण्याच्या दोन बाजू,

कोण जवळ,कोण दूर

मोजण्याचा नसे तराजू!

सहज ओळखीतूनही स्नेह होई वृद्धिंगत,

मैत्री जमे नित्य सहवासातून

रमतगमत!

मैत्रीत स्नेह असतोच,

पण स्नेहात मैत्री असेलच असे नाही!

मैत्री म्हणजे आपलेपणाचा हक्क आणि जवळीक

स्नेहामध्ये असे आदर आणि आपुलकी!

दोघांचे आपल्या मनात असे योग्य स्थान,

ह्या नात्यांमध्ये होऊ नये गल्लत,

ठेवायला हवे भान!


              

स्नेह - शर्वरी जोशी


स्नेह जुळावा असा की 

उमलून यावे नाते

आठवणी आळवाव्या

 गोल फिरे जसे जाते...


स्नेह जुळवा गोडसा

भेट घडावी रोजच

दूर राहिलो कीतीही 

वाटे भेटलो आजच...


स्नेह जुळवा कामाशी

स्नेह जुळवा धर्माशी

तिन्ही त्रिकाल ध्यासात

सत्य भेटावे मर्माशी


स्नेह टपोरा मोगरा

त्याच्या सुवास गहीरा

राहो वात्सल्य भारुनी 

जसे जपतो माहेरा


स्नेह सुंगधी अत्तर

त्याच सुगंधाचा फाया

शब्द तसे गोड..बोलू

मोहरावी मने काया...


नवी सुरुवात - वनजा देव

 खरं तर आयुष्याच्या प्रवासातले प्रत्येक वळणच

असते नवी सुरूवात,

जन्म,शिक्षण,नोकरी,प्रपंच

आणि शेवटचे उतारवय,

शिकत राहतो आपण 

कधी चुकतो,सावरतो,

कधी यशस्वी,कधी अयशस्वी,पण

प्रयत्न अथक करत राहतो!

 सुरूवात चांगली व्हावी

ही  केवळ इच्छा 

असून चालत नाही,

करायला लागतात कष्ट आणि मनात असावी लागते जिद्द!

व्यवहाराच्या पलीकडेही असतात अनेक कामना,

खूप काही छंद आणि भावना!

पण कोणतीही सुरूवात करणं,

वाटतं तितका सोपा नाही खेळ,

भावना,अर्थकारण,वेळ 

सार्यांचा घालावा लागतो यथायोग्य मेळ!

अन्यथा,दिवस,वार मास वर्ष सरत जातात,

कशाची करायची होती सुरूवात,

त्या फक्त सलणार्या आठवणी होतात.


 यास्तव ,दिवस वार मुहूर्ताची बघू नये वाट,

योग्य संधी मिळताच  

शुभस्य शीघ्रम् म्हणत

करावी लगेच नवी सुरूवात!


       

नवी सुरुवात - आशुतोष नूलकर

 सुरुवात करू ही नव्याने


करूया आता नवी सुरुवात, तोरण बांधून दारात


गुढी ही चैतन्याची, जणू काही ती पर्वणीच सुखाची


सुरू झाले नवीन मराठी वर्ष, स्वागत करूया सर्वे मिळून सहर्ष,


मराठी वर्षाचे पहिले पान चैत्राचे, या वर्षवृक्षावर फुल उमलू दे मैत्राचे


नवी सुरुवात करायची पण ती कशी ह्या प्रश्नामध्येच अनेकजण हे फसलेले दिसून येतात. त्यासाठी अनेक तर्कवितर्क, विचार, प्रश्न, उत्तरे, गोंधळ असे सर्वांचे मिश्रण एकत्रितपणे आपल्या मनामध्ये दाटून येते. या सर्व मिश्रणातून तोडगा म्हणून आपल्याला मुक्तता हवी असते आणि ती मिळते आपल्याला हव्या असलेल्या नव्या सुरुवातीने..


खरं तर सुरुवात आपण कोणत्याही क्षणी करू शकतो फक्त त्या सुरुवातीला सोबत हवी असते ती योग्य आणि मजबूत अशा मनोधैर्याची.. जर हे साहित्य आपल्याकडे उपलब्ध असेल, तर नव्हत्यातल्या गोष्टी देखील करून दाखवण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आणि हे आपण जितक्या लवकर जाणून घेऊ तितक्याच लवकर आपल्यासाठी गोष्टी या सहजसोप्या होऊ शकतील.


काही जण नवीन सुरुवात करण्यासाठी कोणत्याही गोष्टीची वाट बघत बसत नाहीत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली की, ती ते करून मोकळे होतात. तर काही जण हे योग्य वेळेची, योग्य दिवसाची तर काही वेळा योग्य मुहूर्ताची वाट पाहतात आणि तो दिवस आला की, त्यांच्या महत्वाच्या कामांचा श्रीगणेशा करतात. काही वेळा त्यांचा यामागचा हेतू हा पुढे भविष्यात जाऊन या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे किंवा नव्या सुरुवातीला शुभ दिवसाची सुंदर किनार देणे हा असतो. याद्वारे त्यांची ही नवी सुरुवात ही अविस्मरणीय होण्यास मदत होत असते.


कोणत्याही व्यक्तीने केलेली नवीन सुरुवात ही त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. नवीन सुरुवातीकडे पाहायचा प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन त्या व्यक्तीला त्या कामामधून मिळणारे यश ठरवत असतो. ते म्हणतात ना की, कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी त्या गोष्टीची योग्य सुरुवात करणे हे महत्वाचे असते.


कधीकधी असे होते की, आपण ठरवल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीची सुरुवात होत नाही. पण अशा वेळी वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण त्या गोष्टीमध्ये पुढे जाऊन कसे यशस्वी होऊ याबद्दल नेहमी विचार करायला हवा. तसेच नुसता विचार न करता त्या गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी त्या दृष्टीने कृती देखील करायला हवी.


यंदा ९ एप्रिल, २०२४ रोजी गुढीपाडव्यासारख्या सुंदर दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे. त्यादिवशी अनेकांनी त्यांच्या नवीन कामाची नवीन सुरुवात केलेली असेलच. त्यांचे ते काम तडीस नेण्यासाठी त्यांना योग्य ते बळ व मनोधैर्य मिळू देत.


कोणीही त्यांची नवीन सुरुवात करताना आपण आपल्या आयुष्यात आधी झालेल्या चुकांमधून काय शिकलो आहोत हे नेहमी स्मरणात ठेवायला हवे. त्या चुका आपल्या हातून पुन्हा होणार नाहीत याची योग्य ती काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.


गुरू ठाकूर सरांनी त्यांच्या सुंदर शब्दात जुन्या गोष्टींमधून नव्या गोष्टींकडे होणारे संक्रमण हे शब्दबध्द केलेले आहे. ते म्हणजे,


रीत म्हणूनी पुढेही जाणे भागच आहे राहून गेले मागे नक्की काय स्मरेना मिटली जरी दारे सगळी सरत्या वर्षाने तरीही ह्या पायरी वरूनी पाय निघेना...


ही कविता वाचून नक्कीच जुन्या आठवणींना उजाळा दिल्यासारखे होते. पण या जुन्या आठवणींना दिलेला उजाळा आपल्याला भविष्यातील आठवणी आणखीन अविस्मरणीय करण्यास मदत करत असतो. सर्व गोष्टी एकत्रितपणे सामावून घेऊन जो माणूस एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो, ती सुरुवात खऱ्या अर्थाने नवी सुरुवात आहे.



शून्य - वनजा देव

शाळेतल्या गणितात गुण मिळविण्यासाठी सगळेच करतात धडपड,पण

आयुष्याचे गणित सोडविणे त्याहूनही असे अवघड!

अंकगणित,बीजगणित आणि भूमिती

तीनही विषय एकत्र येती!

काळ,काम,वेगाचे अंकगणित,

सुटता सुटत नाही,

क्ष आणि य ची बीजगणितातली समीकरणे 

इथे जुळता जुळत नाहीत!

भूमितीतल्या वर्तुळाच्या परीघाबाहेर जाऊन चालत नाही!

घरातल्या त्रिकोन-

चौकोनांच्या बाजूच जुळत नाहीत !

हातचा राखला तरी वा घेतला तरी,

कशी कोण जाणे,पण

बेरीज चुकते!

दशांश चिन्हांची गफलत

जसे बदले शून्याचे  स्थान !

तसेच जीवनातली एक चूक

बदले समाजातला मान!

 आयुष्याच्या जगण्याचे

 समजून घ्यावे लागते मर्म,

जरा चूक होता,

बोट ठेवायला इतरांना सापडते वर्म! 

त्यास्तव शेवटचे उत्तर नसावे  अपूर्ण!

नसावी कुठली बाकी!

देणे -घेणे,राग -लोभ,

प्रेम -असूया,

सारे इथले इथे सोडून

यावे  उत्तर शून्य !

म्हणजे होईल आयुष्य सुफळ संपूर्ण!

शून्याचे स्थान आहे इथे चिरंतन,

त्यातूनच विश्वाचे निर्माण

आर्यभट्टांनी शोध लावला ,

भारताला लाभला विश्वात मान 

असावा त्याचा अभिमान!




शून्याची गंमत -- सुनिता वैद्य

एकदा काय झाले, 

काय झाले, काय झाले

शून्य रुसून कोपऱ्यात बसले...


आई म्हणाली, काय झाले बाळा?

म्हणाला, किंमतच नाही मुळी मला....


पेपर वर दिसताच मुले होतात खिन्न... 

आणि

भागाकरात आलो तर सगळेच सुन्न...


संख्येत मिळवून गेलो काय

किंवा संख्येतून वजा झालो काय

किंवा संख्येच्या डावीकडे बसलो  काय

तरी बदलत नाही उत्तर म्हणजे

मुळी किंमतच नाही मला...


आईने पटकन उचलून घेतले 

संख्येच्या उजवीकडे नेवून बसवले

संख्येची किंमत लगेच वाढली

बघता बघता वाढतच गेली...

अन् शून्याची स्वारी खूष झाली,

गालात खुदकन हसू लागली...



शून्य - अनीता जोशी

 शब्दांनीच काढिले वर्म 

शब्दातून घातला घाव 

संयम सुटला मनाचा

जसे मनास आले खेळीला डाव


बोचरे शब्द झेलताना वाटले

 जणू टोचले असंख्य काटे

 अर्थ त्याचे काळीज भेदीत गेले  

अश्रू होऊन वाहिले डोळ्यां वाटे


हृदयशून्य या दुनियेशी

 आता कितपत झगडावे

 माणसानेच का रे 

माणुसकीला सोडावे


 शब्द फुलांच्या बागेतून

 का नच शब्द वेचून आणावे 

नाहक वर्म काढत 

नात्यांचे धागे तोडावे


 शब्द फुलांच्या गुंफित माळा 

बनवावे अलंकार

 बहरून येईल नाते 

आनंदाला नुरे पारावार

मी - दुष्यंत देशपांडे

मी रडतखडत उभारी धरत घडत गेलो 

तासून घासून मलाच मी घडवीत की हो गेलो 

घाव माझ्यावर कित्येकानी कुठे कुठे हो केले

 मी स्वतःच स्वतःला सुबक घडवत गेलो 

खडतर वाटा कित्येक होत्या भेटल्या

 वेदना दाबीत उराशी मी पुढेच चालत गेलो 

प्रवासामाजी कित्येक चांगली सोबतही भेटली

 माणसातली माणुसकी पहात अन शोधत मी गेलो 

पायावरती उभे राहणे जगानेच की हो शिकविले

 एक एक पाऊल टाकता मी तरुन की हो गेलो

 आता मागे वळून पाहता वाट अंधुकशी हो दिसे 

किती अंतर चाललो माझे मीच विसरून गेलो

 पुढचा स्वच्छ प्रकाशच आता आहे फक्त उरला

 मागचा अंधार मी केव्हांच विसरून गेलो 



भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...