Saturday, 5 April 2025

पाणी - सौ. नीता जोशी

 पाणी

सुखाचं आणि वेदनांचं दोन्ही वेळचं पाणी एकाच वेळी कसं काय येऊ शकते डोळ्यांत? 

माणसाच्या भावनांचा किती सुंदर हा मिलाफ 


वेदना प्रसुतीच्या सहन करतांना 

वाहत राहते डोळ्यांतून पाणी

प्रतिबिंब आपुले हाती पाहता 

जीवन सार्थक, पाणी लोचनी 


लेकीची करतांना पाठवणी

वियोगाचे डोळा पाणी 

चांगला जोडीदार मिळाला 

म्हणूनी मन असे समाधानी


प्रगती पाहतांना पिल्लांची

अभिमानाने भरतो ऊर 

परदेशी त्यांची गाडी निघता

मनी मायेचे उठे काहूर 



भेट - शर्वरी जोशी

 ‌ कृष्णस्पर्श...**

पहाट झाली यामुनेकाठी

धुक्यात घुमतो मंजुळ पावा

लोहगोल ये क्षितिजा वरती

राधा स्मरते मन्मनी रावा


 पारावरची भेट कालची

 क्षण क्षण राधा स्मरे माधवा

  स्पर्श आठवे अंग थर थरे

  हृदयामध्ये गोड कालवा


तिन्हीसांजेची मुग्ध वेळ ती

तिरक्या होत्या लांब सावल्या

 पाऊलवाटा गवता मधल्या

सोनेरी किरणांनी भारल्या


  तेच किरण सोनेरी तनुवर

होती  चमकत  काया सुंदर 

कणकण अंग कनकचि झाले

 जिथे स्पर्शला तो मुरलीधर


जागृती येता तिजसी कळले

सत्य नव्हे ते स्वप्न  खरेतर

तन मन अवघे व्यापून उरला

राधे हृदयी तो हृदयेश्वर...

  

भेट - माधुरी केळकर

 भेट

या प्रसंगी काय 'भेट ' देऊ तुला ? खरं तर हा अडचणीत  टाकणारा प्रश्न...

पण ' भेट ' या शब्दातच उत्सुकता आहे.

लहान मुलांना काही भेटवस्तू मिळाली ,तर त्यांच्या  चेहर्‍यावरचा आनंद आठवा जरा...

आपली मराठी भाषा अत्यंत समृद्ध  आहे. एखादा शब्द  आपण विविध  प्रकारे वापरू शकतो. हा भेट शब्दच बघाना.

लहानपणीचा एखादा मित्र/मैत्रीण  अनपेक्षित पणे अनेक वर्षांनी भेटले ,तर त्या भेटीचा आनंद अवर्णनीय  असतो.

'भेटशील तू नव्याने' अशी आशा बाळगणारा प्रियकर 

प्रेयसीच्या भेटीची आस लावून  असतो.

उतार वयात नव्याने  मित्र/मैत्रीणी जोडले जातात, 

प्रभातफेरीच्या निमित्ताने भेटत राहतात.

नवराबायको, मित्र-मैत्रीणी

प्रसंगानुरूप एकमेकांना भेटवस्तू देतातच..

अनेक दिवसांनी एकत्र आल्यावर 'पुन्हा भेटूया ग'

असं म्हणून निरोप घेतला जातो. रोज ऑफिसमधे भेटणाऱ्यांना सुद्धा दुसर्‍या दिवशीच्या भेटीची ओढ असतेच की.

परमेश्वर  भेटीची आस लागायला आपण काही साधु-संत नाही.

परमेश्वरालाच जेव्हा आपल्या भेटीची इच्छा  होईल, तेव्हा निमूटपणे त्याच्यामागे चालू लागणारे पामर आपण....असो..

  पण वाईट या गोष्टीचं वाटत की सध्या हा शब्द  

सर्रास  चुकीच्या पद्धतीने वापरला जातो...पेन भेटला, पत्ता नाय भेटला....

अरे,वस्तू  मिळतात..माणसं  भेटतात..असं घसा फोडून सांगावसं वाटतं

  ' मराठी 'ला अभिजाततेचा दर्जा यासाठीच मिळाला का ?


लाट - जान्हवी शिधाये

 लाट

लाट वेगे वेगे येई 

सवे  घेऊन भरती

हळू हळू जाई मागे

लाट सरता ओहोटी 

                 मन  माझे लाट जणू

                  तिच्यासारखेच वागे 

                  भावनांचे येणे जाणे

                  कधी हळू, कधी वेगे 

कधी सुखाची भरती

कधी दुःखाची ओहोटी

दोन्ही वेळा मन माझे

लाटे सम  या तरंगे

                  काही लिहिलेले मनी 

                  लाट नेई ते वाहून

                 काही नको असताना

                  येई सवे ते घेऊन

मन माझे लाट लाट 

सदा देई माझी साथ

कधी वाहत जाताना

ओढे धरून हा हात

                 मन स्वार तिच्यावरी

                 करी जगाची सफर

                मन हलके पिसापरी

                भरे आनंदें हा ऊर



लाट - वनजा देव

 प्रेमाच्या लाटेत वाहून जायचं,

शृंगाराच्या लाटात चिंब भिजायचं,

वेदनांच्या लाटांमधून जन्म घ्यायचा,

उचंबळून येणार्या भावनांच्या लाटा कधी अडवायच्या,

कधी अंगावर घ्यायच्या,

विचारांच्या लाटांना प्रयत्नपूर्वक बांध घालायचा!

सुखाच्या लाटांवर अलगद तरंगायचं,

दुःखाच्या लाटांवर स्वार होऊन त्यांना मागे ढकलायचं!

संकटांच्या लाटांशी कसलेल्या नावाड्यासारखं झुंजायचं,

अन् अंतिम क्षणी जन्मवेळच्या वेदनांच्या लाटाच नशिबी आल्या तर त्यातच मिसळून जायचं!


जन्म-मृत्यु,दोन्ही वेळच्या लाटा सुटकेच्याच,

जन्मवेळी आईची शारिरीक सुटका,

बाळाची नऊ मासांच्या बंदीवासातून सुटका!


भवसागरातल्या ह्या लाटा म्हणजेच जीवन,

जीवनाची अंतिम लाटेत विलीन होणं  म्हणजे

ह्या सर्व लाटांच्या भोवर्यातून सुटका !


           

माहेर - सपना

 माहेर – मायेचं गोकुळ


माहेर माझं, मायचं आंगण,

आईच्या पदराचं गार सावलीभान,

त्या दाराशी उभा भाऊ हसरा,

आठवणींचा गाव, डोळ्यात साठवलेला.


बाबांच्या खांद्यावरचं लहानपण हरवलं,

आईच्या कुशीतले क्षण पानं झालं,

भिंतींनी ऐकलेली माझी हसरी गाणी,

आज सासरी येऊन आठवते त्यांची वाणी.


आईच्या स्वयंपाकाचा तो सुगंध,

बाबांच्या स्पर्शातलं ते प्रेम अनंत,

भाऊबहिणींच्या त्या कोड्या,

आजही मनाच्या गाभाऱ्यात खोल साठल्या.


सासरचं सुख असो, संसाराचा डोलारा,

मन शोधत राहतं माहेरचा वारा,

सणवार आले की डोळे भरतात,

आईच्या कुशीत लपायची आस लपून उरते.


भिंतीही ओळखतात माझ्या पावलांचा ताल,

दरवाज्यावरची तुळस विचारते - "कशी आहेस गं बाळ?"

ओसरीवरचं झोपाळं आजही थांबलेलं,

जणू वाट पाहतंय – “कधी परतशील गं लेकरा?”


माहेर म्हणजे ओलावा…

माहेर म्हणजे आधार…

माहेर म्हणजे आईच्या पदराची सावली…

माहेर म्हणजे आठवणींनी भरलेलं घरदारी…


— "माहेर - कायम मनातलं!"



माहेर - गायत्री

 पक्ष्यांची किलबिल येथे..

आंब्याचा गंध केशरी गं..!

कोकण मेवा रुजतो जेथे..

ते देखणे माहेर माझे गं..!!


मंदिरांचा थाट अनोखा..

नारळाची बाग सुरेख गं..!

घराघरात आपुलकी येथे..

ते देखणे माहेर माझे गं..!!


निसर्गाची किमया येथे..

प्रदूषणावर बंदी गं..!

सागराच्या कुशीत वसले..

ते देखणे माहेर माझे गं..!!


संस्कृतीची सांगड येथे..

संस्कारांची शिदोरी गं..!

नात्यांना जे जोडूनी ठेवी..

ते देखणे माहेर माझे गं..!!



होळी - वनजा देव

सर्वस्वाची करूनी होळी

स्वातंत्र्य आणले ज्यांनी खेचूनी,

ते हुतात्मे,ते महात्मे

इतिहासाच्या पुस्तकात 

अमर जाहले!

परी,त्याच स्वातंत्र्यापायी

झाली

 अखंड हिंदुस्थानाची फाळणी अन् 

सप्तरंगांची उधळण न होता  

पुनश्च एकदा

कितीकांच्या सर्वस्वाची झाली होळी!

आजही सीमेवरच्या किती पिढ्या सोसताहेत

त्या होळीची धग ,

 त्या धगीतूनच परत परत

पेट घेत आहे जुने वैर!


वचने,आश्वासनांच्या वा

युद्ध,तह,वाटाघाटींच्या शिंपणाने

 शांत होत नाहीये ही होळी

आणि धुळवड मात्र सारखी साजरी होतीये!

एका ठिणगीही पुरते आहे प्रज्वलित करण्या 

मनामनातला सुप्त निखारा!

शांतवाया त्यांना पुरे न पडे हवेतच विरणारा पोकळ शब्दांचा फवारा,

हवा त्यास्तव शीतल कृतीयुक्त तुषारांचा शिडकावा!

तरच थांबेल

रंगारंगांमधले चालू युद्ध,

अंबरी खुलेल सप्तरंगी इंद्रधनुष्य!


       

होळी - शुभांगी तपस्वी



रंगसखा रंगिला

रंगासवे रंगला

राधाधर सावळा

रासरंगी दंगला


घननीळा धूम्रवर्णी अवकाश मंडळातून अलवार रेशीमधारा छेडीत श्रावणात बरसतो... तेंव्हा नादमधुर सानिका अधराशी धरून नादसखा नादामध्ये नादावतो...धुंद धारात चिंब चिंब भिजतो...अवनीच्या ओल्या कुशीत ओलेता ओलावतो,मृदगंधात गंधावतो...

माया,ममतेच्या मृदु,मुलायम पदराखाली थेंब न थेंब झिरपतो...हिरवा गर्द मोरपिसारा हळूहळू आसमंतात फुलतो,परिसर गर्भरेशमी गर्भाळतो... पुलकीत झालेली सृष्टी नव्या नव्हाळीत रूजलेले,मोरपंखात वसलेले एकेक रंग बावरे रंगधनू उलगडत,उमलवत विविधांगी प्रसवते...

आकाश निळाईतून हिरवाई प्रगटते...हे रंगसंगतीत रंगलेले,गंधलेले ऋतुगंध उधळीत निसर्गदेवता प्रकृती पुरुषाच्या मनोमिलनाचे भावगर्भी भावनांचे एकेक स्तर उत्कटपणे मनामनात रूजवते...ही ऋत्वीक ऋतुजा ऋतुपरत्वे वेगवेगळे साज इतक्या सहज सुलभ रीतीने बदलते...सार्‍या रंगात रंगून ती नाविन्याच्या उन्मेषात रममाण होते...ही राधाधराची अविरत वाहणारी धारा तीच राधा वसंतोत्सवात,होळीच्या रंगोत्सवात सुगधी सुवासात परिमळते...रासक्रीडा वृंदावनी खेळण्यात खेळीयाड दंग होतात...राधाकृष्णाची ही अमरप्रेम कहाणी युगानुयुगे प्रीतरंगात आकंठ डुंबलेली असते...कृष्णाच्या शिरपेचात मोठ्या प्रेमाने खोचलेले भावस्पर्शी मोरपंखी मोरपीस प्रीतगंध जागवते गंधवेल फुलवते...होळीच्या नवरंगात रंगोत्सव उजळते...!!!





स्त्री : माधुरी डोंगळीकर

 ती


ती आहे म्हणुनी विश्व भासते सुंदर

अन् स्वर्गच फुलतो वावरताना घरभर

 सहचरी सखी ती कन्या भगिनी पळभर

 हृदयात उसळतो मातृत्वाचा सागर !


तनु कोमल नाजुक म्हणती सारे अबला

हळुवार बोलुनी मोहविते ती सकला

ही स्वप्नामधली नुरली आता  बाला 

होणार अता ती स्वयंसिद्ध अन् सबला ! 


सोसुनी विखारी चटके आयुष्याचे

उघडते नवनवे दालन ती ज्ञानाचे

आचार विचारी वारे प्रगल्भतेचे

 बळ देते तिजला तिच्यात विश्वासाचे !


गगनात घेउनी उंचच उंच भरारी

धडपडते परी न फिरते ती माघारी 

ती सत्याची अन् न्यायाची कैवारी

चंडिका कालिका दुर्गा तारणहारी !


प्रश्नांना लाखो देते रोजच उत्तर

अस्तित्वासाठी युगायुगांचा संगर

 रूपात तिच्या नवदुर्गांचा नित वावर

अंतरी चालतो दिव्य शक्तिचा जागर !


        

स्त्री - गायत्री

 "ती" शौर्याची ज्योत खरी..

"ती" चांदणवाट अलवार गं..!

"ती" निर्मळ माय माऊली..

"ती" दुर्गेचा अवतार गं...!!


"ती" लखलखणारी वीज नभी..

"ती" चंचल पाऊसधारा गं..!

"ती" वाळूतली नक्षी हळवी..

"ती" ज्वलंत पेटता निखारा गं...!!


"ती" सरस्वती अन् लक्ष्मी..

"ती" कुटुंबाचा आधार गं..!

"ती" ध्येयवेडी अन् स्वप्नवेडी..

"ती" लाजणारा शृंगार गं..!!


"ती" कणखर, कर्तृत्ववान..

"ती" गाथा समर्पणाची गं..!

"ती" सहनशील अन् स्वाभिमानी..

"ती" जननी या जगताची गं..!!!


   

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...