मला आवडलेलं पुस्तक.......!"पावन खिंड", "शिव छत्रपती","मी वनवासी", "हिटलर वर लिहिलं गेलेलं कुठलही पुस्तक-उदा."नाझी भस्मासुराचा उदयास्त", "हिटलर"इ. अशी बरीच पुस्तक आवडतात......!पण आज जे पुस्तक मी शेअर करणार.....ते म्हणजे मला कुठल्याही पानापासून ,केव्हाही आवडीने वाचाव वाटत असं--- आ.पु.ल.नच -"असा मी असामी"! "हे" पुस्तक नाहीच.....ही यात्रा आहे!ही मांदियाळी आहे!हा प्रवास आहे!आणि हे हळूच गुगुदुल्या करत आपल्या वर्मावर बोट ठेवणार "पात्रांचं आणि व्यक्तिचित्रणानच"मोठ्ठ संग्रहालय आहे.सर्व सामान्य मानवी स्वभावाच्या सप्तरंगी छटांच दर्शन आपल्याला "यात"होत.सर्वसामान्य , मध्यम वर्गीय लोकांना जगण्यासाठी करावी लागणारी तडजोड , काहीच नाही तर एक चांगल निष्पाप -कुणाच्याही वाट्याला न जाता फक्त आपला आयुष्य-गाडा हाकताना करावी लागणारी कसरत, ह्या सगळ्या गोष्टींशी आपण वाचता-वाचता केव्हाच एकरूप होत ते कळत देखील नाही. आपण स्वत:ही आपला शोध घ्यायला लागतो की......मानसिक दृष्ट्या मी निश्चित यापैकी कुठल्यातरी पात्राशी मिळती-जुळती आहे.कारण कुठल्याच वयोमानाच पात्र यातून सुटलेलं नाही.आणि प्रत्येक पात्राला आपण त्या-त्या वयाच्या चोचल्या- नखर्यानसह भेटतो.अगदी गृहिणी पासून तर "बाबांपर्यंत"कितीतरी पात्र त्या काळातला शब्दांचा ,सामाजिक परिस्थितीचा परिचय करून देतात. पूर्वी असलेला लोकांमधला जिव्हाळा, चाळीतल एकोप्याचं जगण , एकमेकांच्या दु:ख सुखात आनंदाने सहभागी होणारे शेजारी या ही "संस्कृती"शीआपली जवळून गाठ-भेट होते.छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंदित होण्याची सर्व सामान्य माणसाची समाधानी -मानसिकता पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणात आपण पाहतो. सोबतच खूप साऱ्या खोट्या -मोठेपणाच्या संकल्पनानशि जुळवून घेताना -साधी-सुधी माणस किती गोंधळून जातात आणि त्यांच्या मुळच्या साधे पणापर्यंत सतत परतून जातात.हे वास्तव देखील "या"पुस्तकाच एक वैशिष्ट्य म्हणता येईल. राहिली गोष्ट लेखकांची.....तर आ.पु.ल.न विषयी लिहिण म्हणजे आपल्या अज्ञानाच प्रदर्शन होऊ शकत......कारण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि त्यांच्या विषयी माहिती नसणारी व्यक्ती महाराष्ट्रात मिळणे अशक्य.....त्यामुळे आ.पु.ल.ना प्रणाम,नमस्कार.....!इतक्या सुंदर "भाव विश्वाची"निर्मिती आपल्या साठी केली म्हणून.......!खर सांगायचं तर या पुस्तकाला "नव चैतन्यच"वरदान आहे...आपण जितक्या वेळा वाचतो...तितकच ते पुन्हा -पुन्हा वाचाव वाटत; आणि प्रत्येक वेळी वाचल्यानंतर पुन्हा एकदा वाचाव ही ओढ कायम राहते.
Saturday, 5 April 2025
विश्वास - शमिका
मनमें है विश्वास,पूरा हो विश्वास,हम होंगे कामयाब एक दिन !
ह्या ओळी अगदी सार्थ आहेत.कुठलीही गोष्ट दुसऱ्यासाठी वा स्वतःसाठी करतांना एकमेकांबद्दल किंवा स्वतःबद्दल विश्वास असेल तर कोणतीच समस्या येणार नाही.
अगदी बाळ असल्यापासून मोठं होईपर्यंत त्याचा आईवर अतिशय विश्वास असतो.पण मोठं होता होता(शिंग फुटल्यावर) मुलाने सुद्धा चांगल्या वागणूकीने आईवडिलांचा विश्वास संपादन केला पाहिजे.पति पत्नी मधे विश्वास असेल तर कौटुंबिक स्वास्थ्य लाभते.नाहीतर मुलाबाळांसकट संसाराची वाट लागलेली आपण बघतो.
खेड्यापाड्यात किंवा शहरात सुद्धा कित्येक गोष्टींवर अंधविश्वास ठेऊन संसाराची धूळधाण उडालेली दिसते.तरीही आता अंनिस संस्थेने पुढाकार घेऊन परिस्थिती खूपशी आटोक्यात आणलेली आहे !
म्हणूनच आपण विश्वासार्ह वागून आणि चांगले आचरण ठेवून आपले नातेवाईक,मित्र परिवार ह्यांची मर्जी संपादन केली तर जीवन आनंदात आणि सुखात जाईल.
भास -- प्रज्ञा कोर्डे
भास
अनुत्तरीत प्रश्नांना ,उत्तराची आस
कविता म्हणजे निव्वळ भास
भरून येते ,उमलून येते
शब्दांची पालखी सजून येते
अर्था अर्थांच्या बसतात गाठी
विचारात जातो तांसन्तास
कविता म्हणजे निव्वळ भास
स्वप्नांवर जडतो जीव
शब्दांची भाषा सजीव
मन मोर पिसारा फुलतो
गंधाळलेला नवा श्वास
कविता म्हणजे निव्वळ भास
भाव आडकतात वेशीमध्ये
अर्थ दडतात शब्दांमध्ये
शब्दांनाही फुटतात पाय
गुंतता गुंतता होते रास
कविता म्हणजे निव्वळ भास
कळते तरी वळत नाही
सुटु म्हणता सुटत नाही
रोज नव्याने जवळ येते
गुटमळत राहते आसपास
कविता म्हणजे निव्वळ भास
माय मराठी - विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
‘ लाभले आम्हास भाग्य...’
‘ जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी..’ असे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने आपल्या आईचा आणि मातृभूमीचा गौरव करताना म्हटले आहे. त्यात आपल्या मातृभाषेचा समावेश करायला हरकत नाही. ज्ञानेश्वर माउलींनी तर म्हटलेच आहे-
माझा मऱ्हाटाची बोलू कवतुके
परी अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन.
मराठी भाषेतील थोर लेखक, कवी, नाटककार कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिन म्हणून जगभर साजरा होतो. जगाच्या कान्याकोपऱ्यात जिथे कुठे मराठी माणूस असेल तो अभिमानाने हा दिवस साजरा करतो. मराठीची आठवण करतो, मायभूमीची आठवण करतो. ही मराठी माती इतकी पवित्र आहे की कुसुमाग्रज म्हणतात
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्याखोऱ्यातील शिळा.
मराठी भाषेतील अभंग असो वा ओवी, तिला सुभाषिताचे मोल प्राप्त झाले आहे.
रत्नजडीत अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णातुनी फिरे, सरस्वतीची पालखी.
या आमच्या मायमराठीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. या अर्थाने माझी मराठी ऐतिहासिक आहे, अक्षर आहे, अभिजात आहे. आई जसे आपल्या बालकाचे पालनपोषण करते, तसे या मराठीने तुमचे आमचे पोषण केले आहे. हजारो वर्षांपासून. ते स्तन्य पाजून तिने आपल्याला बळ प्रदान केले आहे. आपले सांस्कृतिक वैभव वाढवले आहे. तिच्या अंगाखांद्यावर खेळतच आपण मोठे झालो आहोत. मग तिला कसे विसरता येईल...
माधव ज्युलियन यांच्या शब्दात सांगायचे झाले तर
मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे.
नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे.
हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू, वसे आमुच्या हृन्मंदिरी.
जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे, हिला बैसवू वैभवाच्या शिरी.
ही नैतिक जबाबदारी आज तुमच्या आमच्यावर आहे. कारण आम्ही तिचे वारस आहोत.
संस्कृत भाषेतून उगम पावलेली, प्राकृतापासून विकसित झालेली ही मराठी. सातवाहन राजांच्या काळापासून वापरात आली, यादव राजांच्या काळात ती भरभराटीस आली. अनेक संत, कवी, लेखकांनी तिला सुंदर लेणे चढवले. त्यातून ती अधिकच श्रीमंत, ऐश्वर्यसंपन्न होत गेली. विवेकसिंधू हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिला. म्हणून ते आद्य कवी. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील ज्ञान भांडार मराठीत आणून सर्वसामान्यांसाठी खुले केले. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, हरिपाठ आदी ग्रंथ लिहून मराठी भाषेला इतके सामर्थ्य प्राप्त करून दिले की खरोखरच ती ‘ अमृतातेही पैजा ‘ जिंकेल. आणि खरोखरीच इतकी सुंदर भाषा त्यांनी वापरली की ओवी असावी तर ज्ञानेशाची असे म्हटले जाऊ लागले. अखिल विश्वासाठी इतके सुंदर पसायदान ज्ञानेश्वर माउलींनी मराठीत मागितले की ते मराठीचे एक अभिमानाचे अक्षर आणि अमर लेणे झाले.
पुढे संत एकनाथ, समर्थ रामदास, संत तुकाराम, संत नामदेव आदी संतानी नानाविध ग्रंथ लिहून मराठीला आणखी समृद्ध केले. शिवरायांच्या नेतृत्वाखाली ‘ मराठी पाऊल पुढे पडले.’ आणि मायमराठीला राजाश्रय लाभला, लोकाश्रय लाभला. मराठी भाषेला मराठी मातीचा गंध लाभला. अंगावर रोमांच उभे करणारे शूरवीरांचे पोवाडे लिहिले गेले, लावण्या लिहिल्या गेल्या. संत कवी, पंत कवी यांनी मराठीला समृद्ध केले. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, स्वा सावरकर, आगरकर, म. फुले, न्या. रानडे, लोकहितवादी, साने गुरुजी, विनोबा भावे आदींच्या साहित्याने मराठी भाषेला अधिक श्रीमंत केले.
खान्देशच्या मातीत जन्मलेल्या बहिणाबाई, बालकवी आदींच्या कवितांनी तर रसिकांच्या मनावर कायमचे गारुड केले. अशिक्षित असलेल्या बहिणाबाई अहिराणीत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून गेल्या, तर बालकवींनी आपल्या कवितांमधून रंगांची आणि निसर्ग सौंदर्याची उधळण केली. आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, राम गणेश गडकरी, वि वा शिरवाडकर, वि स खांडेकर, गो नि दांडेकर, ना सी फडके, मंगेश पाडगावकर, बा भ बोरकर, भा रा तांबे आदी कवी आणि लेखकांनी अक्षर मराठी साहित्य निर्मिती केली. मराठीतील वाल्मिकी म्हटल्या जाणाऱ्या ग दि माडगुळकर यांनी अक्षर अमर गीतरामायण लिहिले. केवढी थोर साहित्यिकांची मांदियाळी आहे मराठीत ! नावे तरी किती घ्यावीत ! अशा या वेगवेगळ्या कवी आणि लेखकांनी मराठी भाषेला समृद्ध केले आहे.
तरी आज अशी वेळ का येते की आम्हाला म्हणावे लागते की मराठी भाषा जगवली पाहिजे, वाढवली पाहिजे ? त्याचे कारण आम्ही तिचे पुत्र आहोत, तिचे वारस आहोत, तिचे पांग आम्हाला फेडायचे आहेत हे आम्ही कुठेतरी विसरतो. वर्षभरातून एकदा मराठी दिवस आला की आम्हाला मराठीचा अभिमान उरी दाटून येतो. पण पुन्हा वर्षभर गायब ! आमच्या मुलांना आम्ही अट्टाहासाने इंग्रजी शाळेत घालतो. मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत.
इंग्रजी भाषा म्हणून शिकणे आजच्या काळासाठी आवश्यक आहेच याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण यासाठी मातृभाषेचा बळी द्यायला हवा का याचा विचार आपण करणार आहोत की नाही ? मावशीसाठी आईचा बळी द्यायचा का ? आम्ही आमच्या मुलांना आता ‘ चिऊ काऊ ‘ नाही शिकवत. आमचा काऊ म्हणजे आता गाय. चिऊ म्हणजे sparrow. भू भू म्हणजे कुत्रा नाही. आता डॉगी म्हटले जाते. ‘ आई ‘ म्हणुनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी. पण ती हाक आता नाही येत कानी. जिकडे तिकडे ‘ मम्मी शब्द कानावर पडतो. इंग्रजीत प्रेताला मम्मी म्हणतात. मम्मी म्हणताना ओठ मिटले जातात तर आई म्हणताना तोंड उघडले जाते. आ होतो. केवढा मोठा फरक ! ‘ टी व्ही वरच्या साबणाच्या एका जाहिरातीत एक छोटी मुलगी आपल्या आईला ‘ मम्मी ‘ म्हणून हाक मारते. आणि मग ‘ किती सुंदर आहे. She is so talented.’ मम्मी सुद्धा, रॉक स्टार सुद्धा असे इंग्रजाळलेले उद्गार कानी येतात. मोबाईलवर मराठी टाइप करताना मराठीचे जे काही खून पडतात ते तर भयानकच ! ऱ्हस्व, दीर्घ तर अजून पुढचा भाग...! त्याबद्दल मी इथे जास्त बोलत नाही.
म्हणून आमच्या मुलांना आवर्जून मराठी शाळेत टाकले पाहिजे. त्यांना सुदर मराठी पुस्तके वाचायला दिली पाहिजेत. त्यांची गोडी लावली पाहिजे. आधी आपण पालकांनी लावली पाहिजे. मराठी पुस्तके विकत घेऊन वाचली पाहिजेत. मराठी बोला, मराठी चाला, मराठी खा, मराठी प्या, मराठी झोपा, मराठी जागा, मी मराठी, बाणा मराठी, जात मराठी, पंथ मराठी, धर्म मराठी असे अंतर्बाह्य मराठीमय व्हा. आता होळी येते आहे. तेव्हा असा ‘ असा अवघा रंग एक झाला..’ पाहिजे. ती खरी होळी. असे जेव्हा होईल तेव्हा मराठी जगेल, वाचेल, वाढेल. फक्त मराठी दिन साजरा करून नाही भागणार.
सुरेश भटांच्या ओळींनी शेवट करू या
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी.
माय मराठी - राजश्री मानकर
माझ्या मराठीची गोडी अशी अवीट
का म्हणती राजभाषा येईल तुमच्या ध्यानी नीट
काना, मात्रा, उकार, वेलांटी यांसह सजलेली
पूर्ण विराम, स्वल्प विराम, इ. चिन्हांचा शृंगार करूनी भावनांनी ओथंबलेली
कुठला रस कधी योजावा
याचे अचूक आडाखे असलेली
बोलणाऱ्याच्या ह्रदयातूनी साद देणारी
ऐकणाऱ्याच्या ह्रदयास हात घालणारी
संतांची शिकवण ओव्या, कीर्तने, भारूडे यांतूनी
सहज मनावर बिंबवणारी
मायेच्या ममतेने हात देवूनी
पाऊल पुढे नेण्या झटणारी
माय मराठीचे कौतुक करावे तितुके थोडे
देश विदेशातही फडकवी संस्कृतीचे झेंडे
मराठीची बोली जैसी अमृतवाणी
सौंदर्य लेवूनी खुलवी लेखणी
अभिमाने करू जागर मराठी
राजभाषेचा करू एल्गार मराठी
कोटी - वनजा देव
हनुमंताची कोटीच्या कोटी उड्डाणे फक्त आरतीत माहिती असणारी आमची पिढी आणि तशी कोटी उड्डाणे करून यानाने अवकाशमार्गे चंद्रावर,
मंगळावर पोहोचता येतं,हे अनुभवणारी आजची पिढी.सध्या आपण फक्त टी.व्ही.वर बघतो आहोत,
पण असं उड्डाण आपणही अनुभवू शकतो,असा विश्वास मात्र नक्की वाटायला लागला आहे.
अंकलिपी शिकायला लागल्यावर हजारही खूप वाटायचे.लाख म्हणजेही किती ते मोजताना एकावर किती शून्य द्यायची,असा विचार पडायचा.कोटी तर फारच दूरची गोष्ट.कोटीचा आणि आपला कधीही संबंध येणार नाही,ह्याची पक्की खात्रीच होती.पण बघता बघता घरांचे भाव हजारो,लाखो करत किमान एक कोटीपर्यंत कधी कसे गेले,ते कळलेच नाही आणि आता वाटतं,इथे बरेच जण कोट्याधीश आहेत की!
शाब्दिक कोट्यांशी आमची खरी ओळख आपले सर्वांचे लाडके भाई,पु.ल. देशपांड्यांमुळे झाली आणि जवळ जवळ दोन पिढ्यांना ह्या शब्दांनी कोट्यावधी वेळा हसविले आणि आयुष्य समृद्ध केले.म्हणून तर त्यांना "कोट्याधीश पु.ल."म्हणतो आपण.
एक कोटीचं आर्थिक मूल्यही आता फार वाटेनासं झालं आहे,इतका तो शब्द रोज कानावर पडतो आहे. "कौन बनेगा करोडपती" खेळ कोटीपर्यंत पोहोचलेली व्यक्ती क्षणात कशी खाली येते,हे दाखवते आणि सावकाश,स्थिरचित्ताने खेळत कोटीपर्यंत पोहोचता येते,हेही दाखवते.
कोटी आर्थिक असली तर तिचं महत्व प्रत्येकासाठी वेगळं असतं. शाब्दिक कोटी करण्याचा आनंद वेगळा असतो,ऐकण्याचा आनंद वेगळा असतो.
कोटी उड्डाणे करण्याचा आनंद फक्त विमानाच्या पायलटलाच समजत असतो.
कोटी जप,कोटी कोटी प्रणाम, मोजता येतात.पण कोटी कोटी सूर्यकिरणे,
आकाशातून बरसणार्या कोट्यावधी जलधारा कधी कोणी मोजल्या आहेत? तरी आपण म्हणतोच ना!
आपल्याकडे कोटी रु.ची संपत्ती नसली,तरी शाब्दिक कोटी वाचून,ऐकून किंवा स्वतः करून खळखळून हसू शकतो.आनंदाची देवाण घेवाण तर कोट्यावधीवेळा करू शकतो ना! ती तरी जरूर करावी.
कोटी - दुष्यंत देशपांडे ,कराड
कुणी कोटी केल्यावर
हास्याचे फवारे उडतात !
कुणी कोटी जिंकल्यावर
आनंदाने उड्या मारतात !
कोणी कोटी गमावल्यावर
दुःखा वेगाने रडत बसतात !
तर कोणी कोटी जपा नी
आराध्याच्या जवळ जातात !
कोटी एकच पण तिची रूपे किती वेगळी
देऊन जातात सुख ,दुःख आणि आत्मिक सुख !
यातलं नेमकं आपल्याला काय हवंय
हेच माणसाला कळत नाही !
सगळा जन्म आनंद ,सुख ,समाधान
शोधण्यात मिळवण्यात जातो
पण हाती काहीच लागत नाही !
रडत जन्मलो तरी समाधानात जायचं असतं
कुणाचं चांगलं करता नाही आलं तरी वाईट तरी करायचं नसतं
माणूस खरच चांगला होता म्हटलं पाहिजे राहिलेल्यांनी
असं वागून त्यांच्या डोळ्यात दोन थेंब तरी उरायचं असतं !!
किल्याचे मनोगत - विनय भास्कर चितळे
महाराजांचे आम्ही होss किल्ले ।
मुघलांचे परतविले अनेक हल्ले ॥
स्वराज्याच्या गर्जना आम्ही ऐकल्या ।
आमच्या खांद्यावरून तोफा डागल्या ॥
महाराजांची केली आम्ही सेवा ।
दिला तुम्हा स्वराज्याचा ठेवा ॥
माय हिरकणीचे धाडस अनुभवले ।
न्याय-व्यवस्था व राजवैभव पाहिले ॥
मावळ्यांची आम्ही ढालही बनलो ।
सर्व घडामोडींचे साक्षीदार ठारलो ॥
आम्हीही आहोत अस्सल मराठमोळे ।
स्वामी रक्षणार्थ झेलले तोफ-गोळे ॥
ढासळते बुरुज व पडक्या भिंती ।
अशी जरी आमची आज स्थिती ॥
जीर्ण होऊनही एकच् आशा उरी ।
खात्री आहे तीही कराल तुम्ही पुरी ॥
आता नवीन पिढीतील राजे येतील ।
साऱ्या जगावर भगवा फडकवतील ॥
🚩 हर हर महादेव 🚩
छत्रपती शिवाजी महाराज - सौ स्वाती कार्ले..
शहाजी राजे जिजाऊ च्या पोटी
एक पुत्र जन्मला शिवनेरी
शिवाई देवी वरून ठेवले नाव शिवाजी
स्वप्न स्वतंत्र राज्याचे रुजवले मनी
रामाची, नरसिंहाची ऐकवूनी कथा
घडविले तसे त्यांच्या मना
केले शास्त्रात राजनीतित पारंगत
शिस्त, बुध्दी, चातुर्य
गुणांनी घडविले अद् भूत
आदिलशाही, निजामशाही
डच, फ्रेंच,इराण्यांची पातशाही
नेस्तनाबूत करण्यास घडविले तयारीत
शस्त्रात, आणि घोडेस्वारीत
केले निपुण सर्व शक्तीत
फौज सवंगडी मावळ्या सह
लहान वयात घेऊन शपथेसह
एक संघाने केली तयारी लढण्यास
शिस्त, शौर्य, कौशल्य नेतृत्वासह
गड किल्यांची केली निर्मिती
गनिमी कावा धैर्या पोटी
केली रणधुंद रणनीती
रयतेस केले स्वतंत्र दिवस रात्री
संयम , विवेक, आणि राष्ट्रभक्ती
त्याला जोड शिस्त आणि मातृभक्ती
गुण आदर्श त्यांचे जपुया
शौर्य कथा पुढील पीढीस सांगुया...!
पूल - वनजा देव
पूल
रावणाच्या लंकेत जायला वानरांनी बांधला सेतू,
सीतामाईची सुटका करायला जाणे
एवढाच होता हेतू!
पण आज ,
जिकडे पहावे तिकडे
पूलच पूल चोहीकडे!
नदी,नाले वा असो लांबरुंद खाडी,
उभा राहतो रोज नवा पूल,
रस्त्या रस्त्यांवर आहेत
उड्डाणपूल!
वाहने धावती सुसाट
देऊन सार्यांना हूल!
शत्रुने करता उध्वस्त,
वा निसर्गकोपाने होता जमिनदोस्त
काही तासात पूल उभा करण्याचं
लष्कराकडे आहे कौशल्य!
पुलावरून धावती आलिशान गाड्या,
त्याच पुलाखाली घेती कोणी रात्रीचा आसरा!
तिथेच दिवसा चालविती कोणी
बेघर मुलांसाठी शाळा!
पुलाखाली जन्म
शेवटही तिथेच!
पुलाखाली काय घडतंय
वरच्या पुलाला नाही पडत फरक!
दुःख हेच आहे,की
वर आणि खाली धावणार्या दोन्ही जगांना
पुलाची आहे गरज,
पण दोघांमधली दरी जोडायला
नाही बांधला जात संवादाचा एक लहानसाही साकव!
मान्य आहे,प्रगतीसाठी,
भौतिक सुखासाठी निकड आहे नवे नवे पूल बांधण्याची,
पण आयुष्यातली एकटेपणाची दरी बुजवायला ,
गरज आहे
नात्यांमधल्या संवादसेतुंची!
पूल - प्रभाकर जोशी
भावार्थ कट्टा
काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन
पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...
-
लेखक: अॅड. रवींद्रनाथ पाटील समीक्षक: समीर गुधाटे ❝ ही कहाणी तुरुंगात गेल्यानंतरची नाही... ही कहाणी एका माणसाच्या आतल्या तुरुंगातून बाहेर...
-
लेखक: समर परीक्षक: समीर गुधाटे "प्रेम ही फक्त भावना नाही, ती एक तपश्चर्या आहे. राधा हे केवळ नाव नाही, ती अनुभूती आहे." समर या...