Monday, 10 February 2025

मी - वनजा देव

जन्म होतो तेव्हा कुठे माहित असतं,"मी" कोण?

हळूहळू समजत जातं,

मी आणि माझं कोण?

मी म्हणेन तसंच घडावं,

मी मागेन,ते मला लगेच मिळावं!

प्रत्येक "मी"ला असंच वाटत असतं!

 वयाने मोठं होत जाताना

"मी" च्या आतला "मी"ही मोठा होत जातो,

तो सुखावतो,दुखावतो!

"मी"ला भौतिक सुखाची  फार लालसा,

सतत काहीतरी मिळविण्याची आकांक्षा!


"मी" ,"माझं"चं 

"आम्ही","आपलं","आमचं"

म्हणून बदल स्विकारताना

आतल्या "मी"शी होतो  संघर्ष!

घेत रहावा लागतो सारा परामर्श!

ह्या माझ्या आतल्या"मी" चं सुख समाधान नक्की आहे तरी कशात,

 हे समजेपर्यंत निघून जाते निम्मी हयात!

"मी"ला वेळ पाहून गोंजारावं लागतं,

कधी फटकारावंही लागतं,

तो"मी" ताब्यात असेल तर

सारं आयुष्य सोपं होतं!


            

त्याग - राजश्री मानकर

स्वतःच्या सुखाचा ना करूनी विचार

बाळासाठी झिजे रात्रंदिन ती माऊली 

आईविना कोण असेल ती त्यागमूर्ती?


देशाच्या रक्षणा तैनात सीमेवरी

घरदार सोडून कर्तव्याशी बांधील

सैनिकांच्या त्यागाची तुलना कैसी?


घेता घेता दोन कराने 

समाज ऋणातून व्हावे उतराई

इतुका तरी त्याग योजावा मनी?


त्याग करण्या ना व्हावे संन्यासी 

संसारी राहूनी ही साधेल सहजी

प्रेमाचे बांध जोडतील ना पूल?

  

प्रारंभ - अनीता जोशी

 आज अचानक मनात आलं

 आपणही एक कथा लिहावी

 मनातल्या कल्पनांना शब्दरूप देऊन 

कागदावर मांडावी 

घेतली हातात लेखणी 

 प्रारंभ कसा करावा समजेना

 सुरुवातीला काय लिहावे

 हे काही मनास उमगेना 

शब्दांनी मग फेर धरला 

माझा मनाचा कौल त्यांना उमजला 

झरू लागले शब्द

भरभर  कागदावर 

लेखणी बाजूला ठेवली 

कथा लिहून झाल्यावर

खूप आनंद झाला 

कथा मनासारखी जमली 

शब्दांनी माझ्या कल्पनांना

 अनमोल साथ दिली

प्रारंभ - सपना

 नव्या वाटेचा नवा प्रकाश,  

नवी स्वप्नं, नवा विश्वास।  

पहिलं पाऊल पुढे टाकू,  

धैर्याने नव्या दिशा शोधू।।  


उगवत्या सुर्याची पहिली किरण,  

घेऊन येते नवं जीवन।  

प्रत्येक क्षण हा संधी घेई,  

नवा आरंभ नवी उमेद देई।।  


भीती, शंका दूर सारू,  

स्वप्नांच्या दिशेने उंच झेप घेऊ।  

गड्या नवा प्रारंभ आपला,  

यशाची गाणी गाऊ।।  


नवी उमेद, नवी जिद्द,  

नवी आशा, नवी सिद्धी।  

प्रत्येक प्रारंभ हा शुभ असो,  

संकल्प आमचा दृढ राहो।।  



साद - अनीता जोशी

 कधीतरी सांज एकटीच असते 

गजबज आटपलेल्या मांडवागत

 अशा वेळेस ती हळूच येते

घेऊन आठवणींची सोबत

डोळ्यातल्या दाटलेल्या आभाळाला

 हलकेच स्पर्शून जाते 

कशाला आठवणीत गुंततेस सये ??

 गालावर ओघळलेले थेंब

 पुसून जाते

जाताना सांगून जाते...

 प्रत्येक क्षण अमौलीक

 घे  त्याचा आस्वाद

आहे जोवरी जीवन 

 ऐक मनाची साद

साद - विद्याधीश

दूर नभाच्या पल्याड माझे

नाव पुकारे कोण सारखे?

कोण खुणावे मला अवेळी?

सूर कुणाचे हलके हलके?


क्षितिजावरुनी भल्या पहाटे

किरणांसोबत येई कोणी

कानी माझ्या लागुनि आणिक

मूक स्वराने गाई गाणी


गाण्यामधुनी कथा ऐकवी

दूर देशिच्या अद्भुत सुंदर

स्वप्न असे की सत्य कळेना

गोष्ट ऐकता मजला नंतर


कथा संपता भरून राही

एक अनामिक मनात ओढ

क्षितिज लंघुनी पल्याड जावे

हीच एकली इच्छा गाढ


आणिक जाउन असा पोचलो

क्षितिजाच्याही पल्याड जेव्हा

वळुन एकदा साद घातली 

मीच माझिया मनास तेव्हा 



व्यर्थ - प्रज्ञा कोर्डे

 व्यर्थ आहे जन्म तुझा 

व्यर्थ आहे भावना

 प्रेम नात्यात ओल नाही

 व्यर्थ त्या संवेदना 

 

व्यर्थ ती पूजा अन 

व्यर्थ तो धर्म आहे 

माणुसकीचा अंश नाही

 व्यर्थ ते कर्म आहे


व्यर्थ ते पुण्य 

अन व्यर्थ  ते दान आहे

भूक ज्याने क्षमत नाही 

व्यर्थ ते अन्न आहे


व्यर्थ ती स्वप्ने अन्

व्यर्थ तयांची आस आहे

कष्टाविना सर्व मिळेल 

व्यर्थ हा विश्वास आहे


व्यर्थ ते जगणे

व्यर्थ तो ध्यास आहे

अहम भावा पोटी निपजणारा 

व्यर्थ तो श्वास आहे


व्यर्थ - राजश्री मानकर

चिंता उद्याची व्यर्थ कशास?

आजचा क्षणच आहे खास।

क्षणभंगूर जीवन जगूनी घ्यावे,

उद्यावरती व्यर्थ का विसंबावे?

पैसा आज असेल उद्या नसेल,

व्यर्थ चिंतेपायी का झुरावे?

काय मिळविले काय गमावले,

व्यर्थ हिशोब कशास मांडावे?

जे आपुल्या हाती नसते,

व्यर्थ विचारात का बुडावे?

व्यर्थ कुणाशी तुलना कशास?

साधे जगूनी सुखी रहावे।

वेळेचे मोल वेळेवरी जाणावे,

व्यर्थ पश्चाताप ना करावे।

जीवन आपुले ना जावे व्यर्थ,

आठवणीत रहाण्यात आहे अर्थ ।

 - 

जिंकून सुध्दा..... - यशवंत देव

   बुद्धिबळातील राजा

   आज जिंकला होता

   बुद्धिबळाच्या जोरावर

   तरी तो रडत होता

   जिंकून सुध्दा.....

   हत्ती गेले उंट गेले

   घोडे गेले वजीर गेले

   प्यादे सुध्दा गेले

   होते एखाद दुसरे शिल्लक

   सोबत कोणी न उरले

   म्हणून,

   राजा रडत होता

   जिंकून सुध्दा.....

   ही गोष्ट,

   सारीपटावरच्या राजाची नाही

   आयुष्याचा सारीपाटही 

   थोडाफार कळायला लागतो

   नाहीतर,

   जगात मी च्या जगण्यात

   सांगा ना कधी

   कोण कोणासाठी उरतो

   म्हणून बुद्धही,

   कधी कधी कळायला लागतो

   नाहीतर जगात

   कोण कोणासाठी असतो.....

   पृथ्वी, जल, अग्नी

   वायु आणि आकाश

   हेच,

   त्रिकालाबाधित सत्य आहे

   हे ज्याला कळते

   तोच अजरामर असतो

   नाहीतर

   बुद्धिबळाचा पट असो

   वा

   आयुष्याचा

   तो जगात जिंकून सुध्दा

   हरलेला असतो...............


                   

गोष्ट - दुष्यंत देशपांडे ,कराड

उन्हाळ्यात गावाकडं समद्यांची 

          हाथरुणं अंगणात असायची 

 दहा-पंधरा पोरांचं लेंढार 

           तवा आजीभोवती जमायची 

कुटुंब समदं एकत्र होतं 

        सख्खी ,चुलत समधीच असायची 

आत्या ,मामाची पोरं बी

         सुट्टीला सारी एकत्र जमायची 

आजीभोवती मंग गराडा 

          समद्यांचाच पडायचा

 नवी गोष्ट ऐकाया मिळणार म्हुन 

       प्रत्येक जण खुश असायचा

 आजीची गोष्ट कदी मंदी राजा राणीची

       तर कधी कधी भुता-खेता ची 

गोष्ट ऐकुनशान समदी

         लई घाबरून जायाची 

मग रातभर एकमेकांना बिलगून 

          हळूच झोपून जायची

 आता गावाकडं  ना घर राहिलं

       ना आंगण ना गोष्ट सांगणारी आजी

 वन बीएचके च्या फ्लॅट मंदी घरातली

       इनमिन तीघंबी मोबाईल मध्ये बिझी



Sunday, 20 October 2024

नारी तुला सलाम.....


   मायेच्या हाताला

   ओलावा फार

   ठेवता हात पाठीवर

   ' ती ' चा केवढा आधार

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...