Friday, 4 October 2024

झुक झुक झुक झुक आगीनगाडी

     आत्ताच बेंगलोरहून लातूरला जाण्यासाठी रेल्वेत बसलो अन् आठवण झाली ती शाळेत असताना वाचलेल्या कवितेची जीचे शीर्षक होते झुक झुक झुक झुक अगीनगाडी खर तर ती अगीनगाडी न रहाता आता लाईटगाडी झाली आहे पण गाडीत बसल्यास तोच बाज अन् आवाज कायम आहे. 



    आम्ही नांदगांव, लातूर येथील रहिवासी, शिक्षणासाठी लातूर येथे रहात असू, आम्ही शाळा, कॉलेजात असेपर्यंत लातूर येथे कोळशाच्या इंजिनाची नारोगेज रेल्वे होती त्यावेळी रेल्वे स्टेशन जवळच आमची शाळा होती मग मधल्या सुट्टीमध्ये किंवा वेळ मिळेल तेव्हा रूळ पटरीवर जायचं अन् रुळावर खिळे किंवा पिना ठेवायच्या अन् वाट पहायची की तिचे/त्याचे लोहचुंबकामध्ये रूपांतर झाले किंवा नाही पण आजतागायत त्याचा पत्ता लागला नाही ही बात अलहिदा...  त्या छोट्या रेल्वेमध्ये जे बसले त्यांनी खरंच झुकं झुक् झुक झुक अगीनगाडीचा आनंद घेतला आहे आम्ही देखील त्या गाडीमध्ये जायचं म्हणजे श्रावण सोमवारी रामलिंग येथील धबधबा बघायला आणि शंभू महादेवाचे दर्शन घ्यायला, अगीन गाडीच इंजिन म्हणजे कोळशावर चालणार, चालक ज्यावेळी इंजिंनमध्ये कोळसे टाकत असे तो क्षण पाहण्यासारखा असायचा, त्या गाडीचा धूर, तिची शिट्टी तिचा आवाज अन् बाज आजही नजरेसमोरून जात नाही. तर अशा या रेल्वेमध्ये जाणारा आमचा कॉलेजचा सर्व ग्रुप म्हणजे तिकीट काढायची बोतच नाही, बर त्यावेळी रेल्वेमध्ये बसणं हा प्रकारच नव्हता, रेल्वेच्या टपावरच बसायचं किंवा उभ राहायचं, तसच त्यावेळी सोबत पेस्ट, ब्रश, कंगवा, आरसा, पाणी अशा गोष्टी प्रवासात न्यायला पाहिजेत असं कुणालाही वाटत नसे. मात्र सोबत एका मित्राचा टेपरेकॉर्डर असे ज्याला 6 सेल लागत. थोड झुंजू मुंजू झालं सूर्योदय व्हायची वेळ झाली की कडू लिंबाच्या झाडाची वाट बघायची अन् ते टप्प्यात आल्या आल्या त्याचे फाटे तोडून काड्या सर्वांनी वाटून घ्यायच्या अन् सर्वांचा दात घासणे हा महत्वाचा कार्यक्रम सुरू व्हायचा बर तो चालायचा कोठवर तर पुढचं स्टेशन येईपर्यंत. त्याच वेळी टेपरेकॉर्डर वाला मित्र मोठ्या आवाजात गम उठाणे के लिये हे गाणं लावायचा  लगेच दुसरा मित्र अबे फाट फाट जरा देवाची गाणी लाव म्हणायचा अन् ऋणानुबंधाच्या हे गाणं सुरू व्हायचं लगेच तिसरा म्हणायचा आबे इथ काय देव देव करायला आलोत का जरा तेरे चेहरे से नजर नहीं हटती लाव त्याच वेळी आम्ही टेप चा ताबा घेत त्यावेळचं आवडत बुजुर्गोने फर्माया लावल की लगेच डान्स सुरू होई अशा मजा करत असतानाच स्टेशन दिसलं की सर्वांनी  उड्या मारत खाली यायचं हापसा किंवा नळावर तोंड खंगाळायची पाणी प्यायच आणि परत एकदा टपावर, गाडीचा वेग कसा होता हे ऐकायचं तर एक वेळ माझी एक चप्पल वरून खाली पडली आताचे आम्ही असतो तर तशीच सोडून दिली असती पण त्यावेळी खाली उडी मारली पळत पळत मागे जावून चप्पल घेतली अन् परत गाडीवर.. त्यावेळी तडोळ्याचा वडा प्रसिद्ध होता सर्वांना भुका तर लागत मग काय काही जण पैसे देत त्याला बोलत असेपर्यंत पाच, दहा वडे लंपास झालेली असत. एका वेळी स्टेशनच्या बाहेर टरबूज विकायला ठेवली होती त्यावेळी देखील एक मोठं टरबूज मित्रानी केव्हा बाजूला काढल ते फोडून खाईपर्यंत कोणालाही समजल नाही. 

असा सुरू झालेला आमचा प्रवास रामलिंग स्टेशन जवळ येईपर्यंत मजेत होई पण स्टेशन येण्यापूर्वीच खाली उतरण्याची सर्वांना घाई करावी लागे कारण पुढे TT ची भीती असे. मग मजल दरमजल करत डोंगर दऱ्या हिरवी वनराई बघत दगडाचा बॉल हातात घेऊन क्रिकेट खेळत धबधबा पाहण्यासाठी पोचत असू सोबत वेगळे कपडेही नसतं मग काय आहे त्या कपड्यावर धबधब्याखाली मनसोक्त आनंद घेवून कपडे अंगावरच वाळवून महादेवाचे दर्शन घ्यायला जात असू त्यानंतर सर्वांची भुकेने कासावीस होत असल्याने एका मोठ्या झाडाखाली सर्वांनी डबे काढून आंगत पंगत बसली की त्यावेळचा जेवणाचा आस्वाद खरंच अवर्णनीय असायचा. एकदा जेवणं झाली की सर्वांना मरगळ येत असे पण त्याचवेळी वेध लागत ते परतीच्या प्रवासाचे...

-- धीरज कुलकर्णी 

No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...