Friday, 4 October 2024

पाच वर्षापुर्वी चा एक अविस्मरणीय अनुभव..

 

अंबाबाईचे दर्शन घ्यायचे मनात ठरवूनच ठेवले होते. खूप गर्दी असेल, रांगा असतील ,धक्काबुक्की असेल, हे सर्व गृहीत धरूनच जायचे ठरवले. यावेळी देवीची ओटी, शुभ्र फुलांचा हार, साडी, खण ,नारळ, देवीसाठी मंगळसूत्र ,असं सगळं साग्रसंगीत घेऊन गेले होते.आवारा पासूनच भलीमोठी रांग होती. 


काहीही विचार न करता रांगेत उभी राहिले. लोक मध्ये घुसत होते,ढकलत होते, एकमेकांच्या पुढे कसे जाता येईल याचाच विचार सगळे करत होते, कोणी कोणी व्हीआयपी पास आणले होते ,त्यांना थोडी खास वागणूक होती.अशा लोकांची रांग सुद्धा गाभार्‍याच्या दाराशी आल्यावर आमच्याच रांगेत मिसळत होती. देवी सगळ्यांनाच दर्शन देणार होती ,तरीपण प्रत्येक जण या ना त्या पद्धतीने इतरांपेक्षा लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. मला मजाच वाटली त्यांना बघून, किती खोट्या आनंदावर जगत असतो आपण. शेवटी मी गाभाऱ्यात प्रवेश केला गाभाऱ्याच्या दाराशी एवढी धक्काबुक्की झाली, माझ्या हातातील ओटी चे ताट पुजाऱ्याने ओढून घेतले आणि देवीच्या पायाशी ठेवले... माझ्या हातात आता काहीच उरले नाही.. साडी खण मंगळसूत्र... काहीच नाही. गाभार्‍याला प्रदक्षिणा घालू लागले, काळ्‍या, दगडी गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालताना इतक्या गोंधळातून एकदम शांत वाटले. मागे नजर गेली...तर कोणीच नव्हते.. फक्त मी.. आणि देवीचा गाभारा. डोळे मिटून शांत, स्तब्ध उभी राहिले. वाटले.. इतक्या रांगा, धक्काबुक्की, पुढे जाण्यासाठी वाटेल त्या तडजोडी, देवीसाठी महाग साडी, दागिने.. हे सगळं कुठे गेलं?.. या गाभार्‍यात गरीब-श्रीमंत, व्हीआयपी पास वाली माणसं ,वेगळी कुठे दिसत आहेत?.. सगळेच तर एकटे आहेत. आपली माणसे, आपल्या वस्तू ,हे सर्व गाभार्‍याच्या दाराशीच सोडुन.. आत एकटेच यायचे असते... आणि मग या गाभाऱ्याशी एकरूप व्हायचे असते...

-- संपदा कार्लेकर  

No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...