गोष्ट आहे २००४ मधली. तेव्हा माझा धाकटा मुलगा मल्हार पहिलीत म्हणजे ६ वर्षांचा होता. त्याला एक सवय होती, रोज रात्री झोपतांना मी त्याला एक गोष्ट सांगावी आणि तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायची नाही. रामायण, महाभारत यांतल्या छोट्या गोष्टी सांगून झाल्या मग आता रोज नवीन गोष्ट काय सांगायची मला प्रश्न पडायचा.
त्याच सुमारास बाबासाहेबांच्या शिवचरित्र कथनाच्या कॅसेटसचा संच बाजारात आला होता. मी तो पूर्ण संच खरेदी केला आणि त्याला ऐकवू लागले. त्यांचे ते सुंदर कथन, जोशपूर्ण आवाज याने तो इतका भारावून गेला की मला म्हणाला हे गोष्ट सांगणारे कोण आहेत? मला त्यांना भेटता येईल का? तेव्हा मला बाबासाहेब फक्त इतिहासाचा ध्यास घेतलेले लेखक एवढेच त्यांच्याविषयी माहित होते. ओळख तर नव्हतीच पण त्यांचा पत्ता, फोननंबर वगैरे काही माहीत नव्हते. शिवाय एवढी महान व्यक्ती आपल्याला भेटेल का? असेही वाटले. पण याला मात्र त्यांना भेटण्याची ओढ लागली होती. त्या कॅसेटवर पुंरदरे प्रकाशनाचा पत्ता होता. विचार केला या पत्त्यावर पत्र पाठवून विचारू यात. पत्र लिहीले. माझ्या ६ वर्षांच्या मुलाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे आणि त्याला शिवचरित्र खूपच आवडले आहे. पत्रात आमचा फोन नंबर ही दिला होता. ध्यानी मनी नसतांना एक दिवस त्यांचे सहाय्यक प्रतापराव यांचा फोन आला आणि त्यांनी बाबासाहेबांनी भेटायला बोलावल्याचे सांगितले व त्याच सुमारास आंबेगावच्या शिवसृष्टीचा पायाभरणी समारंभ होता त्याचेही आमंत्रण देवून तिथेच भेटायला बोलावले. शिवाय तेव्हाचे पुण्याचे महापौर माऊली शिरवळकर यांना आम्हांला तिकडे घेवून यायला सांगितले. एकाच वेळी दोन महान व्यक्तींची ओळख, सहवास माझ्या पहिलीतल्या मुलामुळे होणार होता.हा अनुभव किती भारी होता काय सांगू? बाबासाहेबांनी स्वतः फिरून त्यांच्या मनातला शिवकाळ ते तिथे कसा साकार करणार आहेत ते अगदी भरभरून सांगितले. त्यांच्या नातवाचे नावही मल्हार होते. पण समोरील व्यक्ती कितीही लहान असली तरी ते कधी एकेरी हाक न मारता पुढे राव जोडत असत. पहिल्यांदा त्याला ते मल्हारराव म्हटल्यावर त्याला ते खूप वेगळे वाटले पण मग तो त्यांच्याशी आजोबा-नातू या नात्यानेच जोडला गेला. एवढ्या लहान मुलाशी संवाद साधतांनाही ते खूप प्रोत्साहन द्यायचे, त्याकाळच्या वस्तू, तलवारी, चिलखत, पुरावे, दाखले याविषयी इतकी भरभरून माहिती द्यायचे की मग त्यालाही ते शिवचरित्र तोंडपाठ झाले. तोही मग शाळेत शिवचरित्र गोष्टीरूपाने कथन करू लागला. त्याची आवड बघून मग त्याला पिंपरीचिंचवड मधील शाळा, मोरे प्रेक्षागृह, गणेशोत्सव इ. ठिकाणी बोलायला बोलवू लागले. मग दुसरीत असतांना त्याला मंचर येथील शिवचरित्र व्याख्यान मालिकेत बोलण्याची संधी मिळाली . तेव्हाचे दुसरे व्याख्याते होते राहुल सोलापूरकर. त्यानंतर मग शाळेत असतांनाच पाबळ,जुन्नर,नाशिक येथील शाळांमध्ये बोलण्याची संधी त्याला मिळाली. दरवेळी अनेक महान व्यक्तींची भेट होवू लागली. नामदेवराव जाधव, पांडुरंग बलकवडे, श्रीमंत कोकाटे, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ इ. मुलामुळे आपल्याला महान व्यक्तींना भेटतां येतेय, त्यांच्याशी संवाद साधता येतोय हे आमच्यासाठी इतका भारी अनुभव होता की तो मनात कायम संस्मरणीय आहे. बाबासाहेबांशी तर दोन तीन महिन्यातून एकदा भेट व्हायचीच शिवाय इतिहासातील भोर येथील कान्होजी जेधेंचे चौदावे वंशज बाळासाहेब जेधे यांना भेटण्याची, त्यांचा वाडा, इतिहासाच्या पाऊलखुणा पाहण्याची संधी तर मिळालीच पण ज्या वाड्यात शिवाजी राजांनी जेवण केले होते त्याच वाड्यात बसून आम्ही जेवण केले हा अनुभव तर काय वर्णावा? खूपच भरून आले होते. आता तो वाडा सरकाराने पाडला असून ते वारसास्थळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. बाजीप्रभू देशपांडे, डबीर यांच्याही वंशजांना भेटता आले. हे सगळे अविस्मरणीय क्षण अनुभवता आले ते शिवचरित्रामुळे. शिवाय बाबासाहेब तेव्हा गड, किल्ल्यांवर आनंदयात्राही काढत असत. त्यांच्याबरोबर रायगड, विशाळगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग इ. अनेक किल्ल्यांना भेट दे ण्याचा योग त्याला मिळालाच पण पावनखिंडीमध्ये उभे राहून बाबासाहेबांसमोर तो प्रसंग वर्णन करण्याची संधी त्याला मिळाली व ते सर्वांना खूप आवडले होते . बाबासाहेबांनी त्याला शिवाजी महाराजांचा फोटो व पुस्तके भेट दिली होती. ज्या अजरामर शिवरायांच्या इतिहासामुळे इतक्या सुंदर क्षणांचे साक्षीदार होता आले, इतके अविस्मरणीय अनुभव मिळाले असे ते बाबासाहेबांचे शिवचरित्र. जीवन समध्द होणे याहून काही का वेगळे असते?
-राजश्री मानकर
No comments:
Post a Comment