Friday, 4 October 2024

हैदराबादहून सुटका.....



चांगले किंवा वाईट अनुभव माणसाला शहाणपण देतात हे खरं असलं तरी प्रत्यक्ष भयंकर अनुभव अनुभवत असताना नंतर त्यातून मिळणाऱ्या  शिक्षणापेक्षा लवकर सुटावं त्यातून अशीच भावना असते. असाच एक थरारक अनुभव माझ्या वाट्याला आला २०२१ मध्ये गांधी जयंतीच्या दिवशी ,अर्थात २ ऑक्टोबरला.गांधीजयंतीचा आलेल्या अनुभवाशी काहीच संबंध नाही हे नमूद करते. 


तर ऑफिसच्या कामानिमित्त एक आठवडाभर हैदराबाद मध्ये गेले होते. ऑफिस आणि फील्ड वरची कामे या सगळ्यामध्ये बराच काळ सिकंदराबाद आणि हैदराबाद मध्येच गेला. त्यामुळे पुण्याला निघायच्या आदल्या रात्री माझ्या शाळेतल्या एका मैत्रिणीला भेटायला जायचं ठरवलं. तिचं घर गच्चीबौली या ठिकाणी म्हणजे तसं शहरापासून दूर आणि IT हब मध्ये. तिथून रिंग रोड ने विमानतळ अवघ्या अर्ध्या तासावर. सगळा विचार करूनच तिच्याकडे आदल्या दिवशी राहायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० चं फ्लाईट होतं."e check in" करूनही पहाटे  ४.३० लाच निघू म्हणजे आयत्यावेळी काही प्रॉब्लेम नको असं रात्री गप्पा मारताना ठरवलं.मस्त जेवण आणि गप्पा झाल्या. पुण्यात मित्र मंडळींसाठी ( त्यांच्या आग्रहाखातर ) साधारण २ किलो Paradise बिर्याणी मैत्रिणीने घरी zomato वर मागवून घेतली होती. सगळं पॅक करून जरा उशीराच झोपले. काळजी नको म्हणून ola ride सुद्धा pre book करून ठेवली. 


आणि तो दिवस उजाडला. मी वेळेत तयार झाले पण pre book केलेली Ola कॅन्सल केली गेली होती. हे असे अनुभव येतातच म्हणत दुसरी राईड बुक करणे सुरू केले. कॅब  मिळेना म्हणून रिक्षा बुक करायला घेतली. पुण्यासारखे हैदराबादचे पण रिक्षावाले कसे कुठे जायला नाकारतात यावर तोंड सुरु होतेच. मैत्रिणीने पण बुकिंग करायला सुरुवात केली. Payment ऑप्शन कॅश असा केल्यावर एक रिक्षा बुक झाली. ट्रॉली बॅग, लॅपटॉप बॅग आणि हातात बिर्याणीच्या पिशव्या असा सगळा व्याप हातात सावरत खाली गेले. तोपर्यंत ती ride पण कॅन्सल झाली. आता ५ वाजून गेले होते. घड्याळाचा काटा भराभर पुढे सरकत होता. उजाडलं नव्हतं. मैत्रिणीच्या नवऱ्याने आता गाडीने जाऊया असं म्हणत तो किल्ली घेण्यासाठी परत वर गेला.तेवढ्यात मला दुसरी रिक्षा राईड मिळाली. माझ्यामुळे एवढ्या पहाटे मैत्रीण आणि तिचा नवरा दोघेही उठून बसले होतेच त्यांना अजून त्रास नको असं वाटत होतं. रिक्षा मिळाल्यावर मैत्रिणीचा आनंदाने निरोप घेऊन तिचा नवरा खाली यायच्या आधीच मी निघाले. आता काय अर्ध्या तासात विमानतळ. फार फार तर ६.१५ ला पोहोचेन. काहीच problem नाही असं म्हणत निघाले. 


Ola track करता येत असली तरी आपला कोणाच्या बापावर विश्वास नाही. गूगल मॅप पण उघडला. गच्चीबौली ते विमानतळ असा सगळा रिंग रोड लांबवर पसरलेला, निर्मनुष्य आणि आजूबाजूला महाकाय खडक असा आहे. अर्थात उजाडलं नसल्याने फार काही दिसत नव्हतं. पण थोडं पुढे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की मॅप जो रस्ता दाखवतो आहे आणि रिक्षा ज्या रस्त्याने जात आहे हे वेगळे आहेत. मी ताबडतोब रिक्षावाल्याला हे विचारलं तेव्हा रिंग रोड काही कारणाने बंद आहे, दुरुस्ती चालू आहे म्हणून रस्ता बदलला आहे असं त्याने सागितलं. बदललेला रस्ता हा प्रचंड दूरचा आहे हे स्पष्ट दिसत होतं. रस्ता निर्मनुष्य होता. तेवढ्यात मला रिक्षावाल्याने हजार रुपये पेट्रोल भरण्यासाठी मागितले. त्याच्याशी "नाही देत पैसे ",म्हणून वाद घालायचा प्रयत्न केला पण याचा उपयोग होणार नाही याची जाणीव मला पुरती झाली होती. हजार रुपये दिले. पेट्रोल न भरताच रिक्षा सुसाट निघाली होती. मी सुन्न झाले होते. हे सगळं पैश्यासाठी चालले होते हे समजले. मी अत्यंत घाबरले होते पण दरम्यान माझी राईड मैत्रिणीला शेअर करून टाकली. 


रस्ता विमानतळाकडे जाणारा नव्हताच. सहा वाजत आले होते जरा उजाडलं होतं पण रस्त्यावर माणसे नव्हती त्यामुळे आरडा ओरड करून काहीच साध्य होणार नव्हतं. तोपर्यंत मैत्रिणीचा WhatsApp वर मेसेज आला की तू खूप लांब जाताना दिसत आहेस.दरम्यान मी अंगावर  जे काही सोनं होतं आणि सगळी महत्वाची डॉक्युमेंट्स माझ्या sling bag मध्ये काढून ठेवली. रिक्षेतून उडी  मारून पळायची वेळ आली तर ही पर्स घेऊन पळायचं असं काहीबाही मनात सुरू होतं. रिक्षेत अगम्य भाषेत गाणी सुरू होती आणि रिक्षावाला मला सतत अजून पैसे मागत होता. मी अजून १००० रुपये त्याला दिले. पेट्रोल का भरलं नाही, रिक्षा कुठे नेत आहात ,रस्ता चुकीचा आहे, माझं फ्लाईट चुकेल तुमच्यामुळे, अशी त्याच्याशी माझी बडबड सुरू होती.माझं डोकं चालणं मात्र आता बंद झालं होतं. 


आता रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली , सुरा/ चाकू काढला तर काय ? अजूनही अनेक शंका कुशंका मनात टोचत होत्याच. आई, बाबा ,नवरा, मुलगी सगळ्यांचे मनात विचार यायला लागले. काय करावं सुचेना आणि तेवढ्यात रिक्षेची गती मंदावली. पुढे रस्त्याचे काम सुरू होते त्यामुळे barricades लावले होते आणि दोन गणवेश धारी ट्रॅफिक पोलीस उभे होते. त्यांना बघताच रिक्षावाल्याने रिक्षा रस्ता सोडून कडेला उंचावर घातली. बाजूला नेत मातीच्या एका ढीगाऱ्यावरून रिक्षा पुढे नेण्याचा प्रयत्न केला.  भयानक विचारांनी पोखरलेल्या माझ्या मेंदूत पोलिसांना बघून क्षणभर एक थंड लहर येऊन गेली. मी प्रचंड शक्ती एकवटून पोलिसांना मदतीची हाक मारली. डोकं रिक्षेतून बाहेर काढून जवळपास खाली उडी मारायच्या प्रयत्नात होते. पण तोवर रिक्षा थांबवली गेली. भाषेचा अडसर होता. पण इंग्लिश हिंदीचा आधार घेऊन झाला तो प्रकार पोलिसांना एका दमात सांगितला. आवाज आणि हात थरथरत होते.आता सकाळचे ६.४५ वाजत आले होते. माझी flight आहे हे समजल्यावर पोलिसांनी जवळचा रस्ता सांगितला. माझा आणि रिक्षावाल्याचा फोन नंबर घेतला. ती राईड मी पोलिसांना शेअर केली. रिक्षावाल्याला त्यांनी दम भरला आणि परत त्याच रिक्षेतून मी निघाले. पोलिसांनी अजून कोणतेही उपाय केले नाहीत किंवा एका महिलेचा जीव धोक्यात आहे असं कळूनही कोणतीही मदत देऊ केली नाही. 


पण त्यानंतर काय झाले कोणास ठाऊक पण माझ्यातच शंभर हत्तींचे बळ आल्यासारखे झाले. मी ठरवलं आता काहीही करून विमानतळ गाठायचे. 

आत्तापर्यंत मैत्रीण फोन वर संपर्कात होती. मी नवऱ्याला फोन लावला आणि थोडक्यात कल्पना दिली. तोपर्यंत साधारण ६.५५ झाले होते. ७.३० चे flight होतं. त्याने PNR नंबर Indigo ला कळवून passenger येत असल्याचे कळवले. 10 मिनिटात मॅप वर विमानतळ दिसत होतं. work tour असल्याने आता बॉसला पण फोन लावून कल्पना दिली. मी पण मध्ये मध्ये पोलिसांना खोटे फोन लावून त्यांना अपडेट्स देत आहे अशी नाटकं करत राहिले. या सगळ्याला वैतागून किंवा अजून काही कारण असावं पण रिक्षावाल्याने रिक्षा हैदराबाद विमानतळाच्या एक किलोमीटर आधीच थांबवली आणि पैश्याची मागणी केली. आता आजूबाजूला अधूनमधून वाहने जलद जात होती पण कोणी थांबून विचारण्याची तसदी घेतली नाही. मी आधीच तयारी केल्याप्रमाणे sling bag गळ्यात टाकली आणि सगळ्या bags आणि बिर्याणी सगळं घेऊन रिक्षेतून आरडाओरडा करत बाहेर पडले. थोड्या अंतरावर विमानतळाचे  security cabin दिसत होते. रिक्षावाल्याने थांबवायचा प्रयत्न केल्यावर त्याला बॅगेने ढकललं आणि त्याचा शर्टचा खिसा धरून ओढला. बाहेर पडलेले माझेच पैसे घेऊन बॅगेत कोंबले आणि जीवाच्या आकांताने मदतीसाठी हाका मारत पळत सुटले. सिक्युरीटी केबिन मधले ऑफिसर तोवर माझ्याकडे धावले.मी धापा टाकत सगळा प्रकार सांगते तोवर रिक्षावाला पळून गेला. ऑफिसरने एक गाडी थांबवून मला विमानतळापर्यंत सोडण्याची व्यवस्था केली. security gate वर फोन करून कळवले. मला ज्या वेगात विमानतळावर आत घेतले गेले आणि ज्याप्रमाणे माझे check in आणि security checking झाले त्याला मात्र तोड नाही. Green corridor केल्याप्रमाणे त्वरेने सगळे खटाटोप पार पडले. जवळजवळ आजूबाजूच्या प्रत्येकाने मला मदत केली. नवऱ्याने सतत indigo  ला फोन करून updates दिले होतेच.मी घामाघूम होऊन, धापा टाकत, रडत, electric vehicle मधून departure gate ला पोहोचले तेव्हा सुमारे ७.२५ झाले होते.मग शटल मध्ये बसून विमानात शिरले तेव्हा ७.३० झाले होते. घशाला कोरड पडली होती. माझा अवतार तर भयानकच झाला होता. आत गेल्या गेल्या गटागट चार पाण्याच्या बाटल्या घशात ओतल्या आणि दीर्घ श्वास घेतला. सगळेजण माझ्याकडे बघत होते पण मला त्याची फिकीर नव्हती.

 

बॉलीवूडलाही लाजवेल असं काही मी गेल्या दोन तासात केलं होतं. आयुष्यात कधीही अनुभवलं नाही असं भयंकर काही अनुभवलं होतं. वाईट माणसे असतात तशी चांगलीही असतात याचा वस्तुपाठ मिळाला होता. यातून एक शिकले की शेवटी वेळ आल्यावर आपणच आपल्याजवळ असतो आणि आपण स्वतः कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याची शर्थ केली तरच बाहेर पडू शकतो. विमान पुण्याकडे निघालं आणि मी हैदराबादहून सुटकेचा निःश्वास टाकला.


यानंतर काय झालं :

१. Ola कडे अर्थात तक्रार दिली. भरपूर follow up केला पण Ola ने  ड्रायव्हर विरुद्ध काहीही पाऊल उचलले नाही. माझ्या असंख्य mails ला समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. हे प्रकरण पुढे दोन महिने चालू होतं. 

२. रिक्षा वाल्याने दोन तीनदा फोन करून धमकी देऊन पैशाची मागणी केल्यावर त्याला घाण शिव्या ऐकवून मी माझी भडास काढली आणि block करुन टाकलं. 

३. आमच्या ऑफिसने ट्रॅव्हल पॉलिसी ( खास करून महिलांसाठी) अजून जास्त दोषमुक्त केली.

   प्रिया साबणे - कुलकर्णी.

   पुणे.

No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...