नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तिचा गौरव! देवीची विविध रुपात पुजा प्रार्थना करायची.त्या विविध रुपांचं स्मरण करायचं.
आपल्या समाजात ही सर्व स्त्री रुपे आपण प्राचीन काळापासून पहातही आहोत.गार्गी मैत्रेयी सारख्या विदुषी होऊन गेल्या.त्यांचा विद्वत्तेचा वारसा आता किती फोफावला आहे ते सध्याच्या स्त्रियांचा बौद्धिक क्षेत्रातला वावर पाहून कळतोच आहे.
देवकीच्या एका कान्हाला यशोदेने आपलं मानलं होतं.आज आमच्या सिंधुताई सपकाळ शेकडो मुलांची माता झाल्या.
आमटे कुटुंबातल्या सर्व स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने समाजकार्यात गुंतलेल्या आहेत.
पतीची इच्छा म्हणून अनंत हाल अपेष्टा सोसून आनंदीबाई जोशींनी जिद्दीने विदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं.पण आयुष्य गमावलं.उलट डाॅ.रखमाबाई राऊतांनी 15/16व्या वर्षी नवर्याच्या घरी नांदायला न जाण्याचा निर्धार करून उच्च वैद्यकीय शिक्षण तर पूर्ण केलेच आणि भारतातली 1ली वैद्यकीय व्यावसायिक महिलेचा मानही मिळवला.
झाशीच्या राणीने महिला सैन्य तयार केलं होतंच.आज आमच्या महिला लष्कराच्या सर्व क्षेत्रात उच्च पदापर्यंत पोहोचत आहेत,अगदी फायटर विमान चालवणं असो की कमांडो प्रशिक्षण ,समुद्राखाली पाणबुडीत रहाणं असो त्या कुठेही मागे नाहीत.आत्ता मागच्या आठवड्यात शीडाच्या बोटीतून जगप्रवासाला निघालेल्या नेव्हीतल्या दोन स्त्रिया ह्या स्त्रीशक्तिचं केवढं मोठं उदाहरण आहे!
आजही राजकारणात त्यामानाने स्त्रिया कमी आहेत.पण आपण इतिहास वाचला तर जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना दिलेले राजकारणाचे धडे,किंवा पती शहाजी राजांशी केलेली सल्ला मसलत,पेशव्यांच्या घराण्यातल्या गोपिकाबाई किंवा राधाबाईंचे पडद्यामागचे राजकारण,अहिल्याबाई होळकरांचा राज्यकारभार आदर्श म्हणून पाहिले पाहिजे,जसं आजच्या काळात आपल्या 1ल्या पंतप्रधान कै इंदिरा गांधी, कै.सुषमा स्वराज,मृणाल गोरे निर्मला सीतारामन् सारख्या स्त्रियांनी राजकारणात आपली नावं कोरली.
कमी प्रमाण असलं तरी मुली मैदानी खेळात,महिला क्रिकेट संघ जिंकत आहेत.कविता राऊत,ललीता बाबरसारख्या किंवा अन्यही ग्रामीण /आदिवासी भागातल्या मुलींनी धावपटु म्हणून नाव कमावलं आहे.
पी.टी.उषा,मेरी कोम अशी किती नावं घ्यावीत!
रिक्षा,बस,रेल्वे,मेट्रो,विमान अशी सर्व वाहने चालविण्या बरोबरच कल्पना चावला,सुनिता विल्यम्स अंतराळातही पोहोचल्या.सुनिता विल्यम्सचं तर अंतराळात रहाण्याचं रेकाॅर्डही आता झालं.
दैनंदिन व्यवहारात स्त्रिया आज कुठेही कमी नाहीत.राहीबाई पोरेसारखी अशिक्षित स्त्री बियाणांच्या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करते.
आज परिस्थितीला ,गरीबीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतात,तेव्हा त्यांच्यामागे त्यांची पत्नी मुलं, कुटुंब,शेत,कर्ज,परिवार सर्व सांभाळतात,त्या पळ काढत नाहीत.इतकी मानसिक,शारीरिक ताकद त्या कशी मिळवतात,हे आश्चर्य आहे.
मागच्या काळातील कितीतरी स्त्रियांनी हातात पोळपाट लाटणं घेऊन ,घरोघरी स्वयंपाकाची किंवा पडतील ती कामं करून आपल्या मुलांना उच्चशिक्षित केलेलं आहे.उदाहरणच द्यायचं झालं तर डाॅ.तात्याराव लहाने ,डाॅ.रघुनाथ माशेलकर पहातोच आहोत आपण.त्यांच्यामागे खंबीरपणे उभी होती ती मातृशक्ति!
आज मला स्त्रियांमध्ये प्रकर्षाने ह्या मातृशक्तिची,लढाऊ वृत्तीची,खंबीरपणे प्रसंगाला तोंड देण्याची उणीव भासते.बाहेरचे जग अतिशय धोकादायक झालं आहे,हे खरं आहे.पण त्याच जगात आपल्या मुलींना त्यांचं आयुष्य काढायचे आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक आईने मुलींना शिक्षण देणे आवश्यक आहेच.असं म्हणतात स्त्रियांना पुरुष ओळखण्याचे अंतर्मन असतं.पण हल्ली ज्या प्रकारे मुली सहज फशी पडतात,प्रलोभनांना बळी पडतात,ते पाहता त्यांना काही कळत असतं का नाही,अशी शंका वाटते.प्राचीन काळात अहिल्येसारखी पतीव्रताही इंद्राने शीलभ्रष्ट गेली.केवळ रावणाच्या कैदेत राहिल्याने सीतेला लोकापवादाला सामोरे जावे लागले,ह्यावरून काहीतरी बोध घेतला गेला पाहिजे.
तसेच वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी बायकोही आता दिसत नाही. तिने पापात सहभागी होण्याचे नाकारले.म्हणून वाल्याचे वाल्मिकी ॠषी झाले.पण आज सगळीकडे भ्रष्टाचार पसरलेला असताना कोणीही स्त्री आपला नवरा,मुलगा,भाऊ वा घरातील अन्य कोणीही पुरुषाविरुद्ध घरात येणार्या पैशाविषयी तक्रार करत नाही.सुखलोलुप जीवनाच्या आहारी गेल्याने चुकीच्या मार्गाने घरात येणारी संपत्ती नाकारणे बहुधा त्यांना जमत नसावे.स्त्रियांनी त्यास विरोध केल्यास भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल का,असा विचार नक्कीच मनात येतो.
तसेच स्त्रीमध्ये जात्याच वत्सलता,माया असल्याने ती मुलांचे लाड करतेच.पण आपला मुलगा बाहेर काय करतो,मुलींशी,महिलांशी कसा वागतो हे बघणे आणि वेळीच त्याचा कान पकडण्याचे कर्तव्यही आजची स्त्री विसरली असावी ,असे अनेक घटनांमधून दिसते.
फक्त हक्काची भाषा करणार्या,स्त्री पुरुष समानतेच्या नादात व्यसनांच्या आहारी जाणार्या नव्या स्त्रीजातीचा उदय आणि प्रसार वेगाने होतोय,हे पाहून खेद वाटतो.
आज उच्चस्थानी पोहोचलेल्या कोणत्याच स्त्रीचा प्रवास सोपा नव्हता,नसणार.पण त्यांनी त्याचा बाऊ केला नाही किंवा गवगवाही.निष्ठेने स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रीत करून ते स्थान स्वकष्टाने मिळवले आहे.
माजी प्रशासकीय अधिकारी नीला सत्यनारायण ह्यांचे पुस्तक वाचताना त्यांनी कशाकशाला तोंड दिले ते कळते.आजही अश्विनी भिडे मुंबई मेट्रोचे काम सांभाळत आहेत.मनीषा म्हैसकर आहेत.इस्त्रो सारख्या नावाजलेल्या संस्थेत चांद्रयान मोहिमेत संशोधक,शास्त्रज्ञ म्हणून काम करण्यात कितीतरी महिलांचा समावेश होता व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीजींने त्यांचे कौतुक केले होते.
एवढी स्त्रीशक्तिची उदाहरणे आपल्याकडे असताना जेव्हा डाॅक्टर,इंजिनिअर किंवा कार्पोरेट क्षेत्रात काम करणार्या महिला कधी सासरच्या,नवर्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या करतात,तेव्हा त्या मनाने किती कमकुवत असतील,असा विचार मनात येतो.ना त्या प्रतिकार करतात,नाआवाज उठवतात.बाया कर्वे,सावित्रीबाई फुले किंवा वर उल्लेखलेल्या नावारुपाला आलेल्या प्रत्येकीने तिथे पोहोचताना संघर्ष केला आहे.कधी समाजाशी,कधी ऑफिसमध्ये,कधी कुटुंबाशी!पण त्यांची आंतरिक ताकद त्यांनी पणाला लावली.स्त्रीच स्त्रीची शत्रु असते.म्हणून तर मुलगा होण्यासाठी,हुंड्यासाठी छळ करण्यात सासू,नणंद पुढे असतात.आणि त्यासाठी एक स्त्रीच जीव गमावते,हे किती भयंकर आहे.!
दुर्गेने राक्षसांचा संहार करण्यासाठी जन्म घेतला.आजच्या स्त्रीला बाहेरचे जे खरे राक्षस गिळंकृत करतात,त्यासाठी प्रसंगावधान,थोडी शारिरीक ताकद ,हुशारी हे सारे गुण आत्मसात करायलाच हवेत.
"भावार्थ"च्या याआधीच्या "अविस्मरणीय प्रसंग"ह्या सदरातला प्रिया साबणे कुलकर्णी ह्यांचा अनुभव त्याअर्थी अत्यंत मोलाचा आहे.त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे.
स्त्री शक्ति म्हणजे चौकाचौकात उभ्या केलेल्या,त्यातही मोठ्या आवाजात कोणतीही गाणी लावलेल्या देवीसमोर एकत्र एका रंगाच्या साड्या नेसून जाणे,फोटो काढणे नव्हे,तर अन्यायाविरुद्ध,घरातल्या गुंड पुरुषांबरोबर युद्ध करण्यासाठी एकत्र येऊन प्रतिकार करण्यासाठी ताकद निर्माण करणे.तरच दुर्गापुजन सार्थकी लागेल.
वनजा देव
No comments:
Post a Comment