तिच तिला गवसली
पुनरपि जन्मा आली
चारधाम यात्रा तिची
याच जन्मी पूर्ण झाली
बाल्य ते वार्धक्य चार अवस्था तिच्यातील पक्षिणीने मोठ्या आत्मीक शक्तीने पार पाडल्या...
तिचे वेगळेपण तिलाच माहिती नसते.हे प्रत्येक स्रीमध्ये ठासून भरलेले असते.तिला अबला ठरवून बाल्य ते वार्धक्य इतक्या बंधनात जखडून ठेवले जाते की,तिच्यातील सर्व शक्तीचे फक्त आणि फक्त खच्चीकरण केले जाते...
तिला पंख फुटण्याआधीच तिचे पंख छाटले जातात...
तिला बळजबरीने जेंव्हा मौन स्विकारावे लागते,तेंव्हा आतल्याआत होणारी तिची घुसमट खूप घातक असते.ती सगळे यांत्रिकपणे करत असते,पण तिचा जीव तिळ तिळ तुटत असतो...
बाल्यही कोमेजते,कौमार्य फुलतच नाही तरीही तारूण्याचे मळे फुलवायचा ती आटोकाट प्रयत्न करते.पिल्लांकडे पाहून सर्वस्व पणाला लावून फुलबाग फुलवते...
तिच्यातील सहनशक्तीची परिसीमा उल्लंघून ती सारी कर्तव्ये बिनबोभाट,
हसत खुशीत पार पाडते.एकेक टप्पा पार पाडतांना वेदनांच्या काटेरी रस्त्यातून मार्गक्रमण करत असतांना,अंतरातील वेदनांना तळाशी खोल खोल दडवून ठेवते...
आदि नाही अंत नाही असे दुःख उगाळण्यात काही अर्थ नाही हे तिला उमजलेले असते...रडून ऐकणारे व हसून चेष्टा करणारे अनेकजण तिला पावला पावलांवर भेटलेले असतात.दुःखाचा बाजार मांडण्यात तिला स्वारस्यही नसते...
तिन्ही धाम ती घरातच सर्व स्री शक्ती एकवटून पूर्ण करते.चौथ्या धामाची आस तिला स्वस्थ बसू देत नाही.जीवन वाटेवरचे अनेक चढउतार तिने न डगमगता पार केलेले असतात...
तिच्यातील प्रचंड वैश्विक शक्ती,जेंव्हा तिला उमगते,तेंव्हा अध्यात्माच्या वाटेवर खूप वरपर्यंत ती पोहोचलेली असते...
पंख छाटलेली पक्षिणी गगनाला गवसणी घालते,पुन्हा मागे वळून बघत नाही. पुढच्या वाटेवर आनंदघन बरसणार आहेत,आपण त्यात चिंब चिंब भिजणार आहोत,याची तिला खात्री असते.सुख वेचायचे हे ठरवले की सुख हात जोडून तुमच्यापुढे उभे राहते.ही प्रगाढ भक्ती,दैवीशक्ती तिच्याकडेच असते.चार होत्या पक्षिणी एका घरट्यात बसलेल्या...हातात हात गुंफून नाच ग घुमा म्हणत स्वानंदात नाचत होत्या,न थकता गोल गोल फिरत होत्या...
खेळवणारा खेळियाड गालातल्या गालात छद्मीपणे हसत होता त्याला पुरते माहित होते खेळणारा पोहोचलेला गडी आहे.डाव जिंकूनच स्वांत सुखात रममाण होणार आहे...!!!
----शुभांगी तपस्वी
No comments:
Post a Comment