Sunday, 20 October 2024

योग्य समन्वय साधणारी स्त्री/ नारी

जिच्यामुळे घरातील अनेक गोष्टींची योग्य सुरुवात होण्यास मदत होते, जिच्यामध्ये देवीचा वास आहे असे समजले जाते, जी सृष्टी वरील मानवजातीच्या अस्तित्वामधील एक महत्वाचा धागा आहे, जिच्यामध्ये स्वतःची एक वेगळीच शक्ती व सामर्थ्य सामावलेले आहे, जी प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्वाची भूमिका बजावते अशी व्यक्ती म्हणजे स्त्री..!! 


जगाच्या इतिहासात स्त्रीचा दुर्दम्य आशावाद आणि परिस्थितीशी झुंजण्याच्या अजोड बळाच्या जोरावर ती सर्वांना पुरून उरली व अजूनही पुरून उरते आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला या धाडसाने पुढे येताना दिसून येत आहेत. धीटपणे व्यक्त होत आहेत. मग तो मंदिर- दर्ग्यातील प्रवेशाचा सामाजिक अधिकाराचा प्रश्न असो, दारूबंदीसारखा धगधगता विषय असो किंवा निर्भया- कोपर्डी सारख्या महिला असुरक्षिततेचा असो. स्त्री शक्तीने सगळीकडे, सगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे यामध्ये काही वादच नाही. 

भारतात जागतिक महिला दिनाच्या किती तरी शतके आधी स्त्रियांना देण्यात आलेल्या सामाजिक श्रेष्ठत्वाचा दर्जा विविध सणांमधून प्रतीत होताे. मातृदिन, प्रेमाचे प्रतीक असलेला पाडवा, ममत्वाची भाऊबीज यांसारख्या सणांमधून स्त्रीला मान मिळतच आला आहे. घरातील स्त्री ही महत्त्वाची आहे, याची जाणीव छोट्या- छोट्या गोष्टींमधून तेव्हापासून दिली जात होती. समाजमन सुद्धा सजग होते. स्त्रीच्या मर्यादेची जाणीव या समाजासह स्त्रीलाही होतीच. पण त्याचबरोबर तिचे सुप्त गुणही ते ओळखून होते. 

जसजसा समाज बदलत गेला, तसतशी या समाजाची गृहितके, समीकरणे ही बदलत गेली, जडणघडण बदलत गेली, भावना बोथट होत गेल्या, एकमेकांविषयी वाटणारी माणूसकी हरवून बसले. हे सगळे फक्त पुरुषांच्या बाबतीतच नाही, तर स्त्रियांच्या बाबतीत देखील घडले आणि प्रत्येक व्यक्ती ही स्वतःची अभिव्यक्ती हरवून बसला. 

पुन्हा तिला स्वतःला मूळ प्रवाहात आणण्यासाठी, गमावलेला आत्मसन्मान तिला स्वतःला गवसण्यासाठी, चाचपडणाऱ्या दिशा शोधण्यासाठी कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागले हे काही वेगळे सांगायला नको. अन्यायाचा कडेलोट झाल्यावर पेटून उठली ती स्त्रीच..!! स्वत:च्या कर्तृत्वाची जाणीव होऊन गगनभरारीचे स्वप्न प्रत्यक्षात आणले तेही स्त्रीनेच..!! जगाच्या इतिहासात स्त्रीचा दुर्दम्य आशावाद आणि परिस्थितीशी झुंजण्याच्या अजोड बळाच्या जोरावर ती सर्वांना पुरून उरली. प्रत्येक क्षेत्रात महिला धाडसाने पुढे येत आहेत, धीटपणे व्यक्त होत आहेत, स्वतःचे मत इतरांसमोर अगदी परखडपणे मांडत आहेत. 

स्त्री ही नवीन काळासोबत स्वतःला जुळवून घेते आहे, तेथे देखील स्वतःच्या कर्तुत्वाने स्वतःचे नाव इतरांच्या मनामध्ये कोरते आहे, सर्व जबाबदाऱ्या अगदी योग्य व व्यवस्थितरित्या पेलते आहे. घर व नोकरी एकत्र सांभाळणे म्हणजे तशी तारेवरची कसरतच.. तरी देखील स्वतःला कमी न समजता, स्वतःचे मी पण हरवून न देता सर्व जबाबदाऱ्या अगदी चोखपणे बजावते आहे. 

प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या अगदी खांद्याला खांंदा लावून स्त्री उभी आहे. आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायला शिकली आहे. तिच्या गुणांना, मतांना घरात आणि समाजातही किंमत आहे. विविध क्षेत्रे तिने पादक्रांत केली आहेत. स्त्रीची सुरक्षितता हा जरी नाजूक मुद्दा असला, तरी आत्मविश्वासाने आज ती व्यक्त होते आहे. भारताचा अविभाज्य घटक असलेले खेडे मात्र यात दोन पावले मागेच आहे. सामाजिक संस्था, सरकार जरी या सगळ्या बदलांसाठी अग्रक्रमाने काम करत असले, तरी तिथली परिस्थिती बदलायला तसा वेळ लागेल. शहर आणि खेडे अशी तुलना केली, तर अत्याचाराची, अन्यायाची रूपे फक्त बदलली आहेत. खेड्यातील स्त्री घरात अडकली आहे. तेथील स्त्रीने घरात अडकून न राहता घराच्या बाहेर पडून या जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायला हवी. त्यासाठी तिला इतर कोणी मदत नाही करणार. याची सुरुवात ही तिची तिलाच करायची आहे. 

आजकाल स्त्रीवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसून येते आहे. आजकालची स्त्री ही यासारख्या तिच्यावर होणाऱ्या अन्यायांना थोडीफार घाबरत जरी असली किंवा तिच्या मनामध्ये सुन्नपणा निर्माण जरी होत असला, तरी देखील आधी सारखी तिची मते ही मनातल्या मनात दडपून न टाकता आत्मविश्वासाने व्यक्त होते आहे. स्त्रीने मनाने अजून मजबूत होणे ही काळाची गरज आहे व स्त्रीने देखील ही गरज वेळीच ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे. 

शहरात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्रीसुद्धा आजकाल सुरक्षित नाही आहे. आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच आलेले स्वतंत्र विचार, मान- अपमानाच्या संकल्पना, शिक्षण, नोकरी या सगळ्यांमुळे झालेली स्वत्वाची जाणीव, उशिरा होणारी मुलींची लग्ने आणि कुठेही तडजोड न करण्याची वृत्ती यामुळे कुटुंब व्यवस्थेवर दूरगामी व घातक परिणाम होताना दिसत आहेत.  एक व्यक्ती म्हणून नक्कीच सांगावेसे वाटते की, सखे भानावर ये, तू खूप कष्टाने आजचे स्थान मिळवले आहेस गं..!! खूप काही गमावले देखील आहेस हे सर्वकाही मिळवण्यासाठी.. तुझ्यातील संवेदनशीलता, सहनशीलता बोथट होऊ देऊ नकोस. आत्मसन्मान आणि आत्ममग्नता यामधील पुसटशी असलेली रेषा वेळीच ओळख. हवे ते साध्य करण्याची शक्ती नक्कीच तुझ्यात आहे. या शक्तीचा योग्य ताे जागर आणि वापर कसा करता येईल त्या दिशेने स्वतःची पाऊले उचल. जर तू त्या दृष्टीने पाऊले उचललीस, तर तू त्यामध्ये नक्कीच सफल होशील एवढे मात्र नक्की..!!


आशुतोष नूलकर

No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...