लेखक: विनायक होगाडे
परीक्षक: समीर गुधाटे
“तु स्वतःतून स्वतःलाच रितं करत गेलास आणि लोकगंगेत ‘आकाशाएवढा’ व्यापून राहिलास...”
डिअर तुकोबा हे केवळ संत तुकाराम महाराजांवरचं पुस्तक नाही — ही आहे एका आधुनिक पत्रकाराच्या श्रद्धेची, कल्पनाशक्तीची आणि संत वाड्.मयाशी जुळलेली त्याच्या अंत:करणातली नाळ.
१६९ पानांची ही साहित्यसंपन्न आणि वैचारिक दृष्टी देणारी रचना आहे. पण पानसंख्येवर जाऊ नका, कारण तिचं "मूल्य" हे केवळ चलनात मोजण्याचं नाही, तर संवेदनांच्या आणि विवेकाच्या तराजूत तोलण्यासारखं आहे.
हे पुस्तक तीन विभागांत विभागलं आहे —
पहिलं प्रकरण तुकारामायण — जिथे संत तुकारामांची कालातीत भेट महान विचारवंत आणि क्रांतिकारींच्या सान्निध्यात घडवली जाते. गांधी, आंबेडकर, फुले, सॉक्रेटिस, कबीर, गाडगेबाबा, दाभोळकर यांच्याशी तुकोबा संवाद साधतात. कल्पना आणि अभ्यासाचा हा संगम केवळ लेखन नसून, तो एक सांस्कृतिक प्रयोग वाटतो.
दुसरं प्रकरण मीडिया ट्रायल ऑन तुकोबा — इथे लेखकाने कल्पनाशक्तीचा अविष्कार करत तुकोबांना आजच्या मीडियाच्या कोर्टात उभं केलं आहे. न्यूज चॅनेल, सोशल मीडियाचे ट्रेंड्स, ट्रोल्स आणि न्यायव्यवस्थेतील साशंकता यांचा एक अफलातून मिलाफ. इंद्रायणीच्या प्रवाहात गाथा बुडवणाऱ्या त्या ऐतिहासिक प्रसंगाला समकालीन माध्यमांतून मांडताना मन हेलावून जातं.
तिसरं आणि शेवटचं प्रकरण डिअर तुकोबा — हे एक पत्र आहे. केवळ लेखकाचं नव्हे, तर प्रत्येक वाचकाच्या मनातल्या तुकारामाशी झालेलं भाष्य. अगदी अंतरंगातून उमटलेलं, कधी मौनातलं, कधी व्याकुळ.
या पुस्तकातील प्रत्येक चित्र, मुखपृष्ठ, आणि संदर्भग्रंथांची निवड ही सजगतेची साक्ष आहे. विनायक होगाडे यांनी संत साहित्य, तुकोबांची गाथा, व सदानंद मोरे, दि.बा. मोकाशी यांसारख्या अभ्यासकांच्या लेखनाचा आधार घेत हा ग्रंथ रचला आहे.
पण पुस्तकाचं खरं सामर्थ्य त्याच्या दृष्टीकोनात आहे — तुकोबांचा वारसा हा केवळ अभंगात नव्हे, तर त्यातल्या प्रश्नांत आहे. आणि हेच प्रश्न आजच्या काळात पुन्हा ऐकायला हवेत, समजून घ्यायला हवेत.
डॉ. सदानंद मोरे यांच्या शब्दांत सांगायचं तर — “पूर्वसुरींशी संवाद साधणं म्हणजे परंपरा जिवंत ठेवणं.”
तर, हे पुस्तक म्हणजे त्या परंपरेचं नवसंजीवन आहे.
विनायक होगाडे हे पत्रकार असून, ही त्यांच्या लेखनातील तिसरी रचना आहे. पण ‘डिअर तुकोबा’ ही केवळ तिसरी संख्या नाही — ती मराठी साहित्यातील एक वैचारिक युग आहे, जिथे संतांचे विचार वर्तमानात पुन्हा उमलतात.
“डिअर तुकोबा” हे वाचणं म्हणजे श्रद्धेच्या पलीकडं जाऊन विवेकानं संतांना समजून घेणं.
हे पुस्तक म्हणजे एका वाचकाच्या अंतर्मनातून उमटलेली तुकोबांची पुनर्भेट आहे.
आणि शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं —
डिअर विनायक... तुमची पुढची कलमं आम्ही आतुरतेनं वाट पाहतो आहोत. शारदामातेचा वरदहस्त कायम राहो.

No comments:
Post a Comment