पुस्तक: अक्की – A Journey of Will, Son & Click
लेखक: संतोष परांजपे
परीक्षक: समीर गुधाटे
“शरीर थकून जातं… पण मन जर उठून उभं राहिलं, तर साऱ्या साखळदंडांना मोडणारी शक्ती त्यातूनच जन्म घेते.”
‘अक्की – A Journey of Will, Son & Click’ हे केवळ एका आजारी मुलाचं आत्मचरित्र नाही — ती आहे एका संपूर्ण कुटुंबाच्या विश्वासाची, संघर्षाची आणि एका जिद्दी मुलाच्या स्वाभिमानात गुंफलेली असामान्य जीवनगाथा.
विल्सनसारख्या दुर्मीळ आणि गुंतागुंतीच्या आजाराशी झुंजत, अक्षय परांजपेने आपल्या आयुष्याला केवळ सामोरं गेलं नाही, तर त्याचं रूपांतर एका कलात्मक यशात केलं. ही कहाणी सुरू होते एका खेळकर, मध्यमवर्गीय कुटुंबापासून, जिथे प्रेम आहे, आशा आहे, आणि आहे एक साधं सरळ आयुष्य. पण आयुष्य कधीच सरळ रेषेत जात नाही, आणि अक्षयच्या बाबतीत तर ही रेषा अक्षरशः हादरून गेली.
साधा ताप, ऐकू न येणं, आणि मग एकामागोमाग एक धक्के. मेंदूवर परिणाम करणारा आजार, शरीरावरचं नियंत्रण हरवणं, बोलण्याची, चालण्याची ताकद गमावणं… पण तरीही न गमावलेली इच्छाशक्ती.
या कहाणीचं खरे हिरो आहेत — अक्षयचे आई-वडील, बहिण, आणि साऱ्या अडथळ्यांना सामोरे जाणाऱ्या त्यांच्या अंत:प्रेरणांमधील श्रद्धा. “या ७० टक्के लोकं मरतात” हे ऐकून अक्षयचं उत्तर होतं — “३० टक्के जगतात ना!” हे वाक्य हेच दाखवतं की अक्की म्हणजे हाडाचा योद्धा आहे.
कॉपर मेंदूत साचत जातं, पण मनाच्या ठिकाणी साठलेली आशा त्या सगळ्यावर मात करते.
कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या उपचारांमुळे त्याला नवसंजीवनी मिळाली, पण आयुष्यचं खरं औषध त्याच्या कुटुंबीयांचं प्रेम, जिद्द आणि त्याच्यावरचा विश्वास होतं.
शरीर हलत असतानाही डोळ्यात स्थिर नजर ठेवून एका क्षणाचा ‘क्लिक’ टिपणारा हा फोटोग्राफर — ‘अक्की’ — मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांचा लाडका बनतो. सतत हालचाल करणाऱ्या शरीरानेही कॅमेऱ्यासमोर स्थिर क्षण मिळवला आणि तो अक्षयचा विजय होता.
या पुस्तकाचं सौंदर्य आहे त्याची मांडणी — एका वडिलांनी आपल्या मुलाच्या आयुष्याकडे पाहिलेल्या दृष्टीकोनातून. त्यात आहे आईचं प्रेम, बहिणीचं समर्पण, आजोबांची साथ, आणि श्रद्धेची अक्षय ज्योत. त्याचबरोबर आहे अक्षयचं स्वतःचं मनोगत, आणि वैभव जोशी, सचिन पिळगांवकर, डॉ. अनु अगरवाल यांसारख्या मान्यवरांचे विचार.
“अक्की” हे पुस्तक म्हणजे हताश होणाऱ्यांसाठी आत्मपरीक्षणाची आणि प्रेरणेची एक मोठी संधी आहे.
ही कथा वाचताना तुम्हाला तुमचं स्वतःचं आयुष्य पुन्हा डोळ्यांसमोर उभं राहील. तुम्हीही विचाराल – “मी इतकं सहज हार का मानतो?”
‘अक्की’ वाचणं म्हणजे केवळ एका मुलाची कहाणी जाणून घेणं नाही – ती आहे आपल्यातील लढवय्या आत्म्याला जागं करणारी एक चैतन्यदायी अनुभूती.
अक्की म्हणजे अक्षय इच्छाशक्ती, अटूट श्रद्धा, आणि एक लढा — स्वतःच्या अस्तित्वासाठी.
अक्की म्हणजे संपूर्ण कुटुंबाच्या धैर्याची, देवावरच्या श्रद्धेची, आणि अपार प्रेमाच्या जिवंत झळाळीची गोष्ट.
अक्की म्हणजे — प्रेरणेचा ‘क्लिक’.

No comments:
Post a Comment