लेखक: प्रेम धांडे
समीक्षक: समीर गुधाटे
केवळ कथा नव्हे, हे भावविश्व आहे.
प्रत्येक ऐतिहासिक कादंबरी वाचताना ती केवळ काळाच्या वळणांवर उभ्या असलेल्या पात्रांची कथा वाटते. परंतु ‘शिवनेत्र बहिर्जी’ वाचताना हे पुस्तक केवळ एक ऐतिहासिक दृष्य दाखवणारी कथा नसून, ती एक भावना आहे, एक शौर्य आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे – एक प्रेरणा आहे.
प्रेम धांडे यांची लेखनशैली अत्यंत प्रगल्भ असून, त्यांनी इतिहासाच्या पानांतून झिरपलेले बारकावे समजून घेतले आहेत. त्या तपशीलांना आपल्या अभ्यासू दृष्टिकोनातून आणि उत्कट कल्पनाशक्तीने एक सशक्त कलेत रूपांतरित केलं आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ एका पात्राभोवती फिरणारी कथा न राहता, संपूर्ण शिवकालीन गुप्तहेर व्यवस्थेचं जिवंत चित्रण ठरतं.
दुसऱ्या खंडाची सुरुवात जंजिऱ्याच्या पार्श्वभूमीवर होते. इथून पुढे कथा एका जबरदस्त गतीने उलगडू लागते – कोकणातील स्त्रियांची सुटका, अफजलखानाचा वध, शहाजीराजे आणि बडी बेगम यांच्यातील चिठ्ठी व्यवहार, अफजलखानाच्या मोहिमेमागचं गूढ, आणि बहिर्जी नाईकांचं अफाट गुप्तधैर्य – हे सगळं इतकं प्रभावीपणे मांडलेलं आहे की, वाचक अक्षरशः त्या काळात वावरतोय असं वाटायला लागतं.
मंदिरांमधून मूर्ती वाचवण्याचं धाडस असो, वा फतेहलश्कर हत्तीला ठार करण्याची योजना – बहिर्जी पथकाचं नियोजन, कौशल्य आणि राष्ट्रप्रेम अंतर्मनाला स्पर्शून जातं. धांडे यांच्या लेखणीतून उभं राहणारं हे दृश्य इतकं प्रत्ययकारी आहे की, वाचताना "हे खरंच घडलं असावं" असं वाटत राहतं.
आज आपण इस्रायली 'मोसाद' किंवा अमेरिकन 'सीआयए' विषयी बोलतो, पण ‘शिवनेत्र बहिर्जी’ वाचताना जाणवतं की आपल्या स्वराज्यात अशीच अत्युच्च दर्जाची, समर्पित आणि राष्ट्रनिष्ठ गुप्तहेर संस्था अस्तित्वात होती – आणि ती होती बहिर्जी नाईकांच्या नेतृत्वाखाली.
ही केवळ एका गुप्तहेराची कथा नाही, तर स्वराज्य घडवताना पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक अनाम वीराची गाथा आहे. ही कादंबरी मराठी मनात अभिमान जागवते – इतिहास जिवंत करतो आणि प्रेरणा देतो.

No comments:
Post a Comment