नमस्कार मंडळी,
मी भावार्थ.
बहुतेक आपण भेटलो असू पूर्वी कदाचित एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. किंवा एखादवेळेस माझ्याकडून एखादं पुस्तक घेऊन गेला असाल तुम्ही पूर्वी कधीतरी. आपल्यासारखे अनेक मित्र, हितचिंतक, चोखंदळ वाचक किंवा रसिक श्रोते भेटून जातात रोज कुणी ना कुणी. अनेकदा कुणीतरी भेटून जातं मग पुनः काही संपर्क रहात नाही. अश्यावेळी म्हटलं की आपल्याला सगळ्यांनाच एकमेकांशी विचारांची देवाण घेवाण करता यावी यासाठी काहीतरी निमित्त हवं.
म्हणजे बघा ते मंडळ, सभा, संमेलन म्हटलं की उगाच तो औपचारिक दिखावा, बडेजाव, हार तुरे वगैरे आधीच दिसायला लागतात नाही का? आणि त्या लांब लांब पल्ल्याच्या भाषणांनी आधीच पोटात गोळा येतो. पुनः तिथे गेल्यावरही चर्चा, संवाद या नावाखाली समोर स्टेज वरूनच एका दिशेला जाणारा मोनोलॉग सुरू होतो. त्यापेक्षा नकोच ते!
मग आपला चौकातला कट्टा काय वाईट? २ मिनिटं अगदी सहज जाताजाता नमस्कार करून भेटायला जावं तर तिथे राजकारणापासून ऑलिंपिक पर्यन्त आणि मागच्या गल्लीत कोण काय करतंय इथपासून युक्रेन युद्धात पुतीन ने काय करायला हवं इथपर्यंत सगळेच विषय हक्काने बोलून होतात की नाही? कारण प्रत्येकाला आपलं मत असतं. आपल्या आपल्या समजुतीप्रमाणे ते मांडण्याचा हक्क असतो. आपल्यासारख्या समविचारी लोकांशी चर्चा करावी वाटते आणि भिन्न विचारांच्या माणसांचंही ऐकावं वाटतं, एखादवेळेस अगदी कडाडून तात्विक वाद घालावा वाटतो आणि आपलंच म्हणणं कसं खरं हे ठासून सांगावं वाटतं. अश्यावेळी मग सगळ्यांना सगळं बोलता यावं यासाठी एखादी हक्काची जागा हवी नाही का?
त्यासाठीच सुरू करतोय - भावार्थ कट्टा!
आपल्यापैकी काहीजण कदाचित माझ्या WhatsApp ग्रुप शी जोडलेलेही असाल. कदाचित तिथूनच इथे आला असाल. नसाल तर या लिंक वरुन त्याचा भाग व्हा बघू लगेच.
ही अशी जागा आहे जिथे सर्वजण आपापल्या विचारांची देवाण घेवाण अगदी मुक्तपणे करू शकतात. तुमच्या व्यक्त झालेल्या विचारांशी आम्ही सहमत नसू देखील, तरीही तुम्हाला ते हक्काने मांडण्याची जागा मात्र आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्ही काही नवीन वाचलं असेल, अनुभवलं असेल तर आम्हाला आवर्जून सांगा. आम्ही ते सर्वांपर्यंत पोहोचवू. दर आठवड्याला आम्ही इथे नवीन नवीन गोष्टी, गप्पा, किस्से, कविता, चारोळ्या, प्रवासांचे अनुभव जोडत जाणार आहोत. तुम्हीही त्याचा भाग व्हा. भावार्थ कट्ट्यावर आपल्या सर्वांच्या मित्र मैत्रिणींना जोडून घ्या. इथे प्रसिद्ध झालेल्या सर्व साहित्यावर तुमच्या टिप्पण्या अवश्य द्या, सहमत असाल किंवा नसाल तरीही. अखेर कुठलाही कट्टा म्हटला की चर्चा, वाद तर व्हायलाच हवेत. त्यातूनच आपण सगळे समृद्ध होत जातो. नाही का?
बाकी कसे आहात सर्वजण आम्हाला लिहून कळवा.
वाचत रहा, लिहीत रहा!
दोन पुस्तक दालनं आम्ही पुण्यात कोथरूड मध्ये आणि कोकणात चिपळूण मध्ये आम्ही चालवतोय. आमच्याशी जोडलेले रहा. जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा प्रत्यक्ष नक्कीच येऊन भेटा. पत्ता खाली देत आहे. तिथे नक्की भेटू.
कळावे
आपला भावार्थ